![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई : राज ठाकरेंच्या आकडेवारीत आणि सरकारी आकडेवारीत जमीन अस्मानचा फरक
Loudspeaker Row : 28 हजार मनसैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या, असं राज ठाकरे म्हणाले. पण राज ठाकरे यांनी दावा केलेली आकडेवारी आणि सरकारी आकडेवारी यात जमीन अस्मानचा फरक आहे.
![मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई : राज ठाकरेंच्या आकडेवारीत आणि सरकारी आकडेवारीत जमीन अस्मानचा फरक Loudspeaker Row : Police action against MNS party worker, the difference between Raj Thackeray's statistics and the government's statistics is huge मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई : राज ठाकरेंच्या आकडेवारीत आणि सरकारी आकडेवारीत जमीन अस्मानचा फरक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/b79385f58fe489bfa3c96bf36de626e9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'भोंगे उतरवा' आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात राज ठाकरे यांनी आपली नाराजी स्पष्टपणे सांगितली. तसंच आंदोलन सुरु करण्यापूर्वी तब्बल 28 हजार मनसैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं, असा दावा राज ठाकरे यांनी केला. परंतु राज ठाकरे यांनी दावा केलेली आकडेवारी आणि सरकारी आकडेवारी यात जमीन अस्मानचा फरक असल्याचं समोर येत आहे.
राज ठाकरेंची आकडेवारी आणि सरकारी आकडेवारीत फरक
आमचे कार्यकर्ते पाकिस्तानचे दहशतवादी असल्याप्रमाणे त्यांचा शोध घेतला जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. पोलिसांनी आपल्या सुमारे 28 हजार मनसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटीस दिल्याचा दावाही राज ठाकरेंनी केला होता. परंतु महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीत राज ठाकरेंनी सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा फारच फरक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांनी 10 मे पर्यंत 10 गुन्हे दाखल केले असून 64 जणांना अटक केली आहे. याशिवाय सुमारे 3860 मनसैनिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे 9334 जणांना CrPC कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. हे सर्व आकडे जोडल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी 13 हजार 258 जणांवर कारवाई केली आहे, जी राज ठाकरेंनी दिलेल्या आकडेवारीच्या निम्मीही नाही.
राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर मनसेच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे संतापले असून, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून पत्र लिहिलं. "राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!" असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांवरील कारवायांचा निषेध नोंदवला आहे.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP
मनसैनिकांवरील कारवाईचा निषेध करत राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं की, "सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)