कर्तीधर्ती लेक गमावली, कुटुंबाचा आधार हरपला; लालबाग अपघातातील मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारने नाहक जीव गमावला
Lalbaug Accident: लालबागमध्ये राहणारी 28 वर्षांची नुपुरा मणियार भीषण अपघातात मरण पावली. नुपुराच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधील मद्यधुंद प्रवासी कारणीभूत ठरला.
Lalbaug Accident News : मुंबई : गणेशोत्सवात नेहमीच गजबजलेलं लालबाग, रविवारी मात्र भीषण अपघातानं हादरल्याचं पाहायला मिळालं. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे एकीकडे बाप्पाच्या आगमनामुळे, तर दुसरीकडे खरेदीसाठी आलेल्या लोकांची गर्दी होती. अशातच, एक बेस्टची बस अनियंत्रित झाली आणि त्या बसनं 9 जणांना उडवलं. काही काळासाठी लालबागमध्ये एकच गोंधळ, आक्रोश पाहायला मिळाला. अपघातातील 9 जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झालेल्या, त्यातील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लालबागमध्ये राहणारी 28 वर्षांची नुपुरा मणियार भीषण अपघातात मरण पावली. नुपुराच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधील मद्यधुंद प्रवासी कारणीभूत ठरला. कारण बस अनियंत्रीत होण्यासाठी हा मद्यधुंद प्रवासी कारणीभूत होता. बेस्ट बसची 66 क्रमांकाची बस बॅलार्ड पिअर येथून राणी लक्ष्मीबाई चौक, सायनच्या दिशेनं जात होती. अशातच, लालबागमधील गणेश टॉकीजजवळ बेस्ट बस येताच, मद्यधुंद प्रवासी आणि चालकामध्ये वाद झाला. त्यानंतर हैदोस घालणाऱ्या प्रवाशानं बसचं स्टेअरिंग खेचलं. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि तिनं तब्बल 9 जणांना उडवलं. या घटनेत नुपूर मणियारनं नाहक जीव गमावला.
लालबाग परिसरात 1 सप्टेंबरला झालेल्या एका बस अपघातात 9 जण जखमी झाले, तर एका कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवणाऱ्या लेकीचा मृत्यू झाला. नुपूराच्या जाण्यानं अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं. दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशामुळे निष्पाप एका मुलीला जीव गमवावा लागला. नक्की हा अपघात कसा झाला? मनियार कुटुंबाची कमावती लेक गेली याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या मणियार कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे.
आपली करती धरती मुलगी गेल्यानं मणियार कुटुंब दुःखाच्या ओझ्याखाली आलं आहे. कुटुंबाला मित्रमंडळींना घरची एक चांगली मुलगी गेल्या ना काय करावं काही कळेना झालंय. कालपर्यंत घरातल्यांसोबत मित्रमंडळींशी हसत खेळत असणारी 28 वर्षीय नुपुरा मनियार आज आपल्यात नाही, याची साधी कल्पनाही कुटुंब करू शकत नाही. पदवीच शिक्षण घेऊन नुकतंच काही महिन्यांपूर्वी नुपुरा वडिलांच्या जागी इन्कम टॅक्समध्ये कामाला होती. कोरोनात वडिलांच्या निधनानंतर आई-बहीणीची संपूर्ण जबाबदारी नुपुरा सांभाळत होती. मात्र काळ आला आणि घात करून गेला. लालबाग येथे झालेल्या अपघातामध्ये निष्पाप नुपुराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मद्यधुंद प्रवाशाच्या चुकीची शिक्षा नुपुराला मिळाली
एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजता सीएसटीहून सायनला जाणारी 66 नंबरची बस चिंचपोकळी येथून खाली उतरत लालबाग सिग्नल जवळ पोहोचली. आणि त्या सिग्नल जवळच एक दुर्दैवी अपघात घडला. हा अपघात दारुच्या नशेत धुंद असलेल्या एका प्रवाशाच्या चुकीमुळे घडला. प्रवासी थांबा नसतानाही हा मद्यधुंद प्रवासी बस थांबवा असं सांगत असल्यामुळे बेस्टच्या बस चालकासोबत वाद घालत होता. यानंतर कहर म्हणजे, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशानं ड्रायव्हरच्या अंगावर हात टाकला. अन् यामुळे बसचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरील गाड्यांना धडक दिली.
मद्यधुंद अवस्थेत असलेला हा प्रवासी दत्ता शिंदे अपघातानंतर पळून जात होता. मात्र, वाहकानं त्याला पकडलं अन्यथा ड्रायव्हर या घटनेत निष्पाप अडकला असता. या घटनेनंतर काळाचौकी पोलिसांनी आरोपी दत्ता शिंदे याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
नुपुराच्या आई-बहीण यांची जबाबदारी कोण घेणार?
एका दारूच्या नशेत असलेल्या या शिंदेमुळे अपघातात अनेक गाड्यांचा नुकसान झालं आहे. तर आठ लोक यामध्ये जखमी आहेत. तर एका निष्पाप आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या नुपुरा मनियार या मुलीच यामध्ये निधन झालं आहे. त्यामुळे आता या कुटुंबाचा काय होणार? याचा प्रश्न कुटुंबीयांना आणि सर्वच मित्रमंडळींना पडलाय.
या अपघातानंतर मणियार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काहीही चूक नसताना आपल्या मुलीला मणियार कुटुंबाला गमवावं लागलं. त्यामुळे याप्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी समस्त मणियार कुटुंब, मित्रमंडळी आणि लालबागवासी यांच्या वतीनं केली जात आहे. नुपूरच्या पाश्चात तिची आई आणि बहीण आहे, त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचं पुढे काय? त्यांना राजकीय मंडळी, सरकार प्रशासन आणि सामाजिक संस्थानी धीर देत मदत करायला हवीय आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, तरचं नुपूरला न्याय मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :