Kurla Bus Accident : समोर स्पार्क झाला, गाडीने स्पीड पकडला अन् नियंत्रण सुटले; बेस्टचा ड्रायव्हर संजय मोरेने अपघातावेळी नेमकं काय सांगितलं?
Kurla Best Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी आरोपी ड्रायव्हरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 21 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई : सोमवारी रात्री कुर्ल्यात झालेल्या अपघाताने मुंबई हादरली. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसताना आरोपी ड्रायव्हरच्या वकिलाने त्यासंबंधी महत्त्वाची बातमी दिली आहे. बस सुरू असताना समोर स्पार्क झाला आणि गाडीवरचे नियंत्रण सुटले असा दावा ड्रायव्हर संजय मोरे यांने केल्याची माहिती त्याचे वकिल समाधान सुलाने यांनी दिली. या संदर्भात सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
कुर्ला अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आणि 48 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी न्यायालयाने संजय मोरे या बेस्ट बस चालकाला 21 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र हा अपघात बसमध्ये स्पार्क झाल्याने झाला असल्याची खळबळजनक माहिती संजय मोरेने त्याच्या वकिलाला दिली. त्यामुळे अपघाताला ड्रायव्हर नाही तर इलेक्ट्रिक वाहनामधील त्रुटी जबाबदार असल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला.
स्पार्क झाली अन् गाडीने स्पीड पकडला
अचानक गाडी समोर स्पार्क झाला आणि गाडीने स्पीड पकडला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले असल्याचं संजय मोरे याने त्याच्या वकिलाला सांगितलं आहे. यामुळे या बाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली आहे. तसेच या निर्णयाबाबत आपण वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचे त्याचे वकील समाधान सुलाने म्हणाले.
जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन?
मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात 7 जणांचा मृत्यू झालाय तर 48 जण जखमी झालेत. या अपघाताला नेमक जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोपी बसचालक संजय मोरे हा आधी कंत्राटी पद्धतीनं बेस्टमध्येच काम करायचा. त्याला 10 दिवसांपूर्वी पुन्हा कंत्राटी पद्धतीनं बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवर ड्रायव्हर म्हणून घेण्यात आलं. पण त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं. एवढं प्रशिक्षण पुरेसं आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे बेस्टमध्ये कंत्राटी भरती सुरू झाल्याचा आरोप भाजपनं केला.
दरम्यान, कुर्ला अपघाताची चौकशी करण्यासाठी महापालिकेने एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात सादर केला जाणार आहे.
ही बातमी वाचा: