Mumbai Rains : मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा कुणीही केला नव्हता : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईची तुंबई झाल्यानं भाजप नेते आशिष शेलार यांचं शिवसेनेवर टीकास्त्र
मुंबई : मंगळवारपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. बुधवार सकाळपासूनच शहरात पावसानं जोर धरला आणि पाहता पाहता मुंबईची तुंबई झाली. नालेसफाई आणि इतर मान्सूनपूर्व कामांच्या बाबतीत पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला दावा नेमका कशाच्या धर्तीवर करण्यात आला होता असाच सूर आळवत या मुद्द्यांवरुन विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरण्यास सुरुवात केली.
विरोधकांची होणारी टीका आणि पालिका प्रशासनाची तयारी याच मुद्द्यांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं. 'सकाळी हायटाईडमुळे आणि पावसाच्या जोरामुळं शहरात काही तासांसाठी पाणी थांबलं होतं. पण, आता मात्र शहरात पावसाचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. आपण गेल्या वर्षापासून हेच सांगत आहोत की पाणी भरणार नाही असा दावा आम्ही केला नाही आणि करणारही नाही. पाणी भरल्यानंतर चार तासांच्या आत पाण्याचा निचरा नाही झाला तर मात्र पालिकेनं केलेलं काम हे बरोबर नाही हे म्हणायला वावगं नाही', असं महापौर म्हणाल्या.
पाणी साचलं त्यावेळी हायटाईड, मोठा पाऊस आणि वॉटर टेबलमधूनही पाणी बाहेर येत होतं अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी थोडं थांबणं गरजेचं आहे, असं सांगत आज मुंबईप्रमाणंच पुण्यातही पाणी तुंबल्याचं उदाहरण त्यांनी दिलं. शिवाय चार तासांहून अधिक वेळेसाठी साचलेलं पाणी शहरात थांबत नाही, असा दावाही त्यांनी केला.
Mumbai Rains : मायानगरी मुंबई 'जलमय'
सद्यपरिस्थितीत मुंबईत चार तासांहून अधिक वेळ होऊनही साचलेलं पाणी मात्र कायम आहे, ही बाब लक्षात आणून देताच याचसंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देत 85 मिमी पर्यंतचा पाऊस आला तर त्याला डायवर्ट करता येऊ शकतं हा मुद्दा त्यांनी माध्यमांपुढे मांडला. मुंबईील काही भागांत पाण्याचा निचरा झाला आहे, असं त्यांनी काही व्हिडीओंचा संदर्भ देत सांगितलं. मुंबईत पाणी भरणार नाही, असा दावा आम्ही केलाच नव्हता, याचाच पुनरुच्चार करत त्यांनी अतीवृष्टी झाल्यास पाणी कायमच राहणार, ही बाब अधोरेखित केली.
परिस्थितीवर पालिका प्रशासनाचं लक्ष
पालिका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यावर कुठेही हलगर्जीपणा दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल अशी ठाम भूमिका यावेळी महापौरांनी मांडली. जास्तीत जास्त मुंबईचे रस्ते पाण्यात जाणार नाहीत याची काळजी आम्ही (प्रशासन) घेत आहोत, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
विरोधकांना काय आरोप करायचे आहेत ते करुदेत
पाणी साचण्याच्या मुद्द्यांवरुन विरोधकांकडून झालेले आरोप पाहता, त्यांना काय आरोप करायचे आहेत ते करुदेत. त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला आम्ही बसलो नसून आम्ही जनतेसाठी काम करतो. आरोपांची उत्तरं देत कामांचा खोळंबा देण्यापेक्षा गरजेची कामं करण्याला आम्ही प्राधान्य देतो, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं. यावेळी हिंदमाता येथील भूमिगत टाक्यांच्या प्रकल्पाचं काम काही अंशी बाकी असल्यामुळं हा प्रकल्प खोळंबला आहे ही बाब स्पष्ट करत येत्या काळात लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.