Atul Mone Family Pahalgam attack : आईने कव्हर केलं, पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या, अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली हादरवणारी कहाणी
Atul Mone Family Pahalgam attack : अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने हिने तिथं काय घडलं ते सांगितलं, ती म्हणाली, आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. तेथील परिस्थिती ठीक होती. सगळं नीट चालू होतं. लोकांचं खाणं पिणं सुरू होतं. लोक एन्जॉय करत होते.

Atul Mone Died in Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागामध्ये पर्यटकांवर मंगळवारी (22 एप्रिल) हल्ला झाला. या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे अधिकारी अतुल मोने यांचा देखील मृत्यू झाला. मध्य रेल्वेच्या परळ कारखान्यात वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) पदावर अतुल मोने कार्यरत होते. अतुल मोने यांच्या परिवाराने एबीपी माझाशी बोलताना त्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने हिने सांगितलं की आईने कव्हर केलं होतं, पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या.
सगळं नीट चालू होतं
अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने हिने तिथं काय घडलं ते सांगितलं, ती म्हणाली, आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. तेथील परिस्थिती ठीक होती. सगळं नीट चालू होतं. लोकांचं खाणं पिणं सुरू होतं. लोक एन्जॉय करत होते. आम्ही तिथून निघत होतो. तेव्हा फायरिंग सुरू झालं. मी स्वतः कन्फ्युज झाले होते. तिथं काय सुरू आहे यावरून, त्यानंतर सर्वजण इकडे तिकडे पळताना दिसले. त्यानंतर खाली झुकत होते. मी पण तसंच केलं. मी पण खाली झुकली होती. थोड्या वेळाने मी डोकावून पाहिलं. त्यावेळी फायरिंग सुरूच होते. मी फायरिंग करणाऱ्या दोघांना पाहिलं होतं. कदाचित आणखी लोक होते. पहिल्यांदा ते दुरून फायरिंग करत होते. नंतर लोकांना ते शूट करायला लागले.
माझ्या डोळ्यासमोर ते रक्त वाहताना बघत होते
आम्ही जिथे सगळे एकत्र होतो. तिथे दोन जण आले. तिथे त्यांनी विचारलं हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. तिथे संजय काकांनी हात वर केला. तेव्हा त्यांना डोक्यात गोळी मारली. मी त्यांच्या मागेच होते. ते सगळं मी बघितलं. नंतर हेमंत काका त्यांना विचारायला गेला की काय झालं. त्यांनाही एका बाजूला शूट केलं. त्यानंतर माझे बाबा बोलले की गोळी नका मारू.आम्ही काही नाही करत. तिथे माझी आई होती मागे, मी होते. ते गोळ्या चालवत होते. मी पण बाबाच्या सोबत होती. आई पुढे बाबाला कव्हर करायला गेली. पण, त्यांनी बाबाच्या पोटात गोळी मारली. त्यानंतर घाबरून मी खाली झुकले आणि माझ्या बाबाजवळ काकू जवळ गेली. आई तिथेच होती. हे सगळं बघून मला तिथे काहीच सुचत नव्हतं. मी जिथे होते तिथे संजय काकांचा डोकं होतं. पूर्ण रक्त पसरलं होतं. माझ्या डोळ्यासमोर ते रक्त वाहताना बघत होते, मला काही सुचत नव्हतं की काय सुरू आहे काय घडतंय.
पुढे अतुल मोने यांच्या पत्नी म्हणाल्या, मी मिस्टरांना वाचवण्यासाठी त्यांना कव्हर करत होती. मी त्यांना माझ्यामागे केलेले लोक माझ्यापुढे होती. तरीसुद्धा त्यांनी बरोबर मिस्टरांना गोळी मारली. हेमंत जोशींना गोळी मारली, त्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की गोळी नका मारू. आम्ही काही करत नाही. आम्ही बसतो त्यांनी असं बोलल्यानंतर त्यांना लगेचच गोळी मारली.
महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल























