IPS दीपक पांडेंचा 'सुपर डान्सर'चा नवा अंदाज; ख्रिस गेलसोबत थिरकतानाचा व्हिडीओ व्हायरल
IPS Deepak Pandey Video : मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या प्रमुख उपस्थितीत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात दीपक पांडे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.
IPS Deepak Pandey Dance Video : नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा सुपर डान्सरचा नवा अंदाज समोर आला आहे. धार्मिक नगरी नाशिकमध्ये रोज पहाटे गोदास्नान करणारे दीपक पांडे, मुंबईच्या मायानगरीत चक्क ख्रिस गेल सोबत पाश्चिमात्य संगीताच्या तालावर थिरकताना दिसून आले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या प्रमुख उपस्थितीत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात दीपक पांडे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.
यावेळी पांडे यांनी पार्टीचा मनमुराद आनंद लुटत डान्स फ्लोअर दणाणून सोडला. आरोग्य संवर्धनासाठी ग्रीन ज्यूस पिण्याचा उपदेश देणारे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणारे, महसूल अधिकाऱ्यांना RDX ची उपमा देणारे दीपक पांडे याआधी कुठल्या न कुठल्या प्रशासकीय कारणाने चर्चेत राहिले आहेत. मात्र आता डान्स नंबरवर थिरकताना दिसल्याने दीपक पांडेंचे नवे रूप बघून सारेच अवाक् झाले आहेत. नुकतंच नाशिकवरुन पांडे यांची बदली मुंबईला करण्यात आली आहे. पांडे यांच्याकडे सध्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी आहे.
नाशिक पोलिस आयुक्त असताना लेटरबॉम्ब आणि वेगवेगळ्या आदेशांमुळे पांडे हे कायम चर्चेत होते. हेल्मेट सक्ती, भोंग्यांवर मनाई आदेश, महसूल खात्यातील लेटर बॉम्ब, बॅनर परवानगी बंधनकारक, मिरवणूक परवानगी आवश्यक असे विविध आदेश पांडे यांनी काढले होते. नारायण राणेंवर केलेल्या कारवाईमुळेही पांडे चर्चेत राहिले. भोंग्याबाबतही मनाई आदेश काढले होते.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटरसारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला होता. तसेच महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती.
हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही, असा आदेश दिल्यामुळे चर्चेत आलेले दीपक पांडे चर्चेत आले होते. ते म्हणजे, त्यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रातून त्यांनी महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली होती. आता मात्र पांडे नव्या कारणानं चर्चेत आले आहेत. त्यांचा डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या :
नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
Nashik : महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार RDX सारखे का? नाशिक पोलीस आयुक्तांनी स्पष्ट सांगितले..