गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाचा शिरकाव पोलीस दलात वाढतच चाला आहे. आतापर्यंत मुंबईत 37 पोलीस कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाले असून 2500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : मुंबई पोलीस दलामध्ये कोरोनाचा शिरकाव वाढतच चाललेला आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांच्या आकड्यांमध्ये 60 टक्क्यापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी हे मुंबईतील आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. मृतांमध्ये मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग आनंद पवार, दादर व समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय मोरे आणि ब्रह्मदेव शेंडगे यांचा समावेश आहे. या तिघांचा गुरुवारी विविध रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वीच मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत जाधव यांचा कोरोनाने बळी घेतल्यानंतर अवघ्या 48 तासात पुन्हा कोरोनाने आणखीन तीन बळी घेतले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार हे पत्नी आणि तीन मुलांसह गिरगावच्या खेतवाडी होते. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. 10 दिवसापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी दिली.
समतानगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार संजय मोरे यांचाही कोरोनाने बळी घेतला. मोरे हे पत्नी आणि दोन मुलासह दहिसर होते. प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मोरे याना वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानांतर ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तिसरी घटना हिंदुजा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दादर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार ब्राह्मदेव शेंडगे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. पोलीस हवालदार शेंडगे हे माहीम पोलीस वसाहतीत पत्नीसह कुटुंब राहत होते. 29 मे ला शेंडगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानांतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. गुरुवारी सकाळी शेंडगे यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मावळली.
मुंबई पोलीस दलाला कोरोनापासून वाचवण्यासाठी विविध उपाययोजना केले जात आहेत मात्र पोलीस हे लोकांच्या थेट संपर्कात असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. पोलिसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 1000 बेडची क्षमता असलेली तीन कोवीड केअर सेंटर मरीन ड्राईव्ह, कालीना, मरोळ या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत आणि त्याचा सकारात्मक परिणाम समोर येताहेत असल्याचे देखील प्रणय अशोक यांनी सांगितले.