योग्य वेळी उत्तर देईन, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर; राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांचं उत्तर
उत्तर सभेतील भाषणात राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंच्या निशाण्यावर होते. परंतु राज ठाकरे यांना महत्त्व देऊ नका, योग्यवेळी उत्तरं देईन अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली. गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर ज्यांनी टीका त्यांना उत्तर सभेतून प्रत्युत्तर दिल. यावेळी महाविकास आघाडीतील, विशेषत: राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरे यांच्या निशाण्यावर होते. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांच्यावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला. परंतु राज ठाकरे यांना महत्त्व देऊ नका अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अजि पवार म्हणाले की, "मी आज धनंजय मुंडेंना भेटायला आलोय. कोणी काहीतरी बोलणार आणि तुम्ही विचारणार...त्यांना फार महत्त्व देऊ नका. माझ्या दृष्टीने आज धनंजय मुंडेंची प्रकृती जास्त महत्त्वाची आहे. माझा सहकारी जिथे अॅडमिट आहे, त्याला भेटायला आलोय. दुसऱ्याही प्रश्नांची योग्य वेळी उत्तरं देईन, त्याची काळजी करु नका, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे."
अजित पवार मी कधी कोणती गोष्ट बोललो ते मला नीट आठवतंय : राज ठाकरे
ठाण्यातील उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे यांनी अजित पवार यांचा आवाज काढत 'लाडके अजित पवार काय म्हणातायेत ते बघा...' असं म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, "त्यांचा एक आवडता शब्द आहे पठ्ठ्या... याला काय म्हणे भोंगे आताच दिसले का? भोंग्यांविरोधी भूमिका घ्यायला आताच सुचली का? याअगोदर काय झोपा काढल्या का?.... अजित पवार मी कधी-कधी कोणती-कोणती गोष्ट बोललोय ना हे मला नीट आठवतंय... तुमच्या फक्त माहितीसाठी मी तीन व्हिडीओ आणलेत...." असं सांगत राज ठाकरे यांनी काही व्हिडीओ सभेत दाखवले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं किंबहुना राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला. त्यांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं होतं. "व्वा रं पठ्ठ्या... साहेबांचं सगळं राजकारण बघितलं तर कुठे जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्व धर्म समभावाचं राजकारण केलं. पण हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावं आता...", असं अजित पवार म्हणाले होते.