मी खरा देशभक्त, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; 'त्या' वक्तव्याबद्दल वारिस पठाण यांचा माफिनामा
माझं वक्तव्य हिंदूविरोधी नव्हतं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो, असं वारिस पठाण यांनी म्हटलं.
मुंबई : एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या प्रक्षोभक वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी केली जात आहे. देशातील 15 कोटी मुस्लीम नाराज असल्याचं मला बोलायचं होतं, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, असं वारिस पठाण यांनी म्हटलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
15 कोटी मुस्लीम 100 कोटी हिंदूंवर भारी पडतील, असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं. मात्र देशातील 15 कोटी मुस्लीम नाराज असल्याचं मला बोलायचं होतं. या देशात 100 लोक असे आहेत, जे आमच्या विरोधात दिसत आहेत. हे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप यांच्यातील आहेत. या 100 लोकांवर आमचे 15 कोटी लोक भारी पडतील, असं मला म्हणायचं होतं. मात्र काही माध्यमांनी माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवलं आहे, असं वारिस पठाण यांनी म्हटलं.
माझं ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. मी खरा देशभक्त आहे. मात्र राजकीय षडयंत्र करुन माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी जे काही बोललो त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो असंही वारिस पठाण म्हणाले.
आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहोत, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य
काय म्हणाले वारिस पठाण?
आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो, तरी 100 कोटींना भारी आहोत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी 15 फेब्रुवारीला हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. मात्र, त्यांनी या वक्तव्यावर कुठलाही आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. "केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आम्ही शिकलोय. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आलीय. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या तरी तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. 15 कोटी आहोत पण 100 कोटींना भारी पडू, लक्षात ठेवा, असं पठाण यावेळी म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलंय.