विद्यार्थ्यांनो, 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस बंदच राहणार, 26 मे पासून सुरू होणार; 3 जूनपर्यंत करा अर्ज
राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून 11 वीच्या (Admission) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपता संपेना झालाय. शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश 26 मे पासून सुरू होणार असून पहिली फेरी प्रत्यक्षात तेव्हाच सुरू होईल. त्यामुळे, गेल्या 2 दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडप़ड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी 4 दिवस थांबावे लागणार आहे. 21 मे रोजी बुधवारी प्रत्यक्षात सुरू होणारी ऑनलाइन अकरावी (SSC results) प्रवेशाची प्रक्रिया वेबसाईट मधील तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर, आता महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून 26 मे ही नवी तारीख देण्यात आली असून 26 मे ते 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येईल.
राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर, 5 जून रोजी पहिली जनरल मेरीट लिस्ट लागणार आहे. 6 ते 7 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवून तक्रार करता येईल. त्यानंतर, 8 जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर होईल.
26 मे पासून ऑनलाइन प्रवेश, नोंदणी
राज्यात शासनाची वेबसाईट सुरू होताच अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे, आता ही प्रवेश प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच दिनांक 26 मे पासून सुरू होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून दरम्यान आपल्या पसंतीचे कॉलेज क्रमांक निवडता येतील, त्यासोबतच संपूर्ण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरता येणार आहे. तर, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी 10 जूनला जाहीर होईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
पोर्टलची सुविधा 4 दिवस बंद
दरम्यान, यापू्र्वी 21 मे रोजी सुरू करण्यात आलेली विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, ती प्रक्रिया रद्द झाली असून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटलं आहे.
तांत्रिक अडचणींनी विद्यार्थी त्रस्त
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र, पहिल्याच दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये. यावर शिक्षण संचालनालयकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे
हेही वाचा
शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























