अल्पवयीन मुलाच्या अपहरण-हत्या प्रकरणी आरोपींची फाशी आणि जन्मठेप हायकोर्टाकडून रद्द
धारवीतील व्यावसायिक राजेश भांगडे यांनी कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून आरोपींनी मालकाच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलाचं अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
मुंबई : मुंबईत 2012 घडलेल्या एका अपहरण आणि हत्या प्रकरणातील एकाची फाशी तर दुसऱ्याची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. इतकच नव्हे तर या दोन्ही आरोपींची बुधवारी हायकोर्टाने निर्देष सुटका केली आहे.
केवळ मोबईलचा सीडीआर आणि आयएमईआय हे पुरावे आरोपी ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत, तसेच याप्रकरणी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला नाही. त्यामुळे सरकारी पक्षाकडे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं निरीक्षण यावेळी हायकोर्टानं नोंदवलं.
साल 2018 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या याप्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या इम्तियाज शेख आणि त्याच्यासोबत असलेल्या जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या आझाद अन्सारीनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. आरोपींच्यावतीनं अॅड. फरहाना शाह यांनी बाजू मांडली.
काय होतं प्रकरण?
धारवीतील व्यावसायिक राजेश भांगडे यांनी कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून आरोपींनी मालकाच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलाचं अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मालकावर सूड उगवण्यासाठी इम्तियाज शेख आणि आझाद अन्सारी यांनी श्री या अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याच दिवशी आपली ओळख पटू नये म्हणून त्याची हत्या केली. श्रीचा मृतदेह त्यांनी भिवंडीतील एका मॅनहोलमध्ये टाकला होता.
त्यानंतर त्यांनी राजेश यांना फोन करुन पैशांची मागणी केली. राजेश यांनी याप्रकरणी पोलिसांची वेळीच मदत घेतल्यानं कॉल रेकॉर्ड डेटावरून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. राजेश यांना करण्यात आलेल्या फोनकॉल्ससाठी वापरण्यात आलेले मोबाईल आणि सिमकार्ड आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केले होते.
याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मे 2018 मध्ये मुख्य सुत्रधार म्हणून इम्तियाज शेखला फाशीची आणि साथीदार म्हणून आझाद अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र पुराव्यांअभावी इसरार शेख आणि अहमद या अन्य दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.