Remdesivir injection : रेमडेसिवीर इंजेक्शनवरून हाय व्होल्टेज ड्रामा; मध्यरात्री देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्यात
Bruck Pharma कंपनीच्या संचालकांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी पोलीस त्यांना पार्ले येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. ही माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवार दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरु होती. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्र सरकारनेही नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं. पण ही लढाई रात्री थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली.
Bruck Pharma कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी पोलीसांनी त्यांना पार्ले येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. ही माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पार्ले पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलीस अधिकारी बीकेसीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. पोलीस कार्यालयात देवेंद्र फडणवीस तासभर ठाण मांडून बसले होते. पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फार्मा कंपनीच्या मालकांना सोडून दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली आहे. भाजपला इंजेक्शनचा साठा कसा देता? यावरून मंत्र्यांच्या ओएसडीकडून Bruck Pharma कंपनीच्या लोकांना धमकावल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Bruck Pharma कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशीदरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे पाच दिवसांपूर्वीच या कंपनीत जाऊन भेट देऊन आले होते. प्रदेश भाजपला 50 हजार रेमडेसिवीरची इंजेक्शनं देण्याची तयारी या कंपनीने दाखवली होती. ही इंजेक्शनं महाराष्ट्र सरकारला देण्याचे या दोन्ही नेत्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आज सकाळी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा सामनाही रंगला होता. पण मध्यरात्री हा वाद थेट पोलीस स्थानकात पोहोचला.
रेमडेसिवीरसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला दुजाभाव? : नवाब मलिक
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरच्या पुरवठा करण्याला नकार दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. यानंतर त्यांच्या या आरोपावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करुन स्पष्टीकरण दिलं. त्यानंतरही नवाब मलिकांनी गुजरात सरकारच्या एका पत्राचा आधार घेत केंद्र सरकारनं महाराष्ट्रासोबत सापत्न वागणूक दिल्याचं म्हटलं आहे. केवळ गुजरात राज्यातच रेमडेसिवीरचा पुरवठा करणार्या निर्यात कंपनीपैकी एकाला मंजुरी दिली आहे, असं पत्र शेअर केलं आहे. या दुटप्पीपणाचे स्पष्टीकरण देता येईल का? असा सवाल केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :