शीना बोरा हत्याकांड : आरोपी इंद्राणी मुखर्जीला दिलासा नाहीच; हायकोर्टाने सहाव्यांदा जामीन अर्ज फेटाळला
sheena bora murder case Indrani Mukerjea : शीरा बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तिने सहाव्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता.
sheena bora murder case शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. साल 2017 पासून इंद्राणीनं जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. हा जामीन अर्ज कोणत्याही विशेष अथवा वैद्यकीय करणासाठी नसून निव्वळ गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आला होता. यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आपण याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाशी सहमत नसल्याचं सागंत ही याचिका फेटाळण्यापूर्वी ती मागे घेण्याची संधीही हायकोर्टानं इंद्राणी मुखर्जी यांना दिली होती. मुलगी शीना बोराचं अपहरण, हत्या आणि मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात इतर सह आरोपींसोबत सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट करत सीबीआयनं या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.
50 वर्षीय इंद्राणी मुखर्जी गेली सहा वर्ष तुरूंगात आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात 253 पैकी केवळ 68 साक्षीदार आजवर तपासून झालेत. त्यामुळे हा खटला लवकर संपण्याची काहीही चिन्ह नाहीत. अश्या परिस्थितीत आणखीन किती काळ आरोपीला तुरूंगात ठेवणार?, असा प्रमुख सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आला होता. याशिवाय इंद्राणीला कारागृहात विविध आजारांनी घेरलंय, तिला सतत मानसिक त्रास होत असल्याचे अहवालही यात जोडण्यात आले होते.
यापूर्वी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यात यावा अशी विनंती इंद्राणीनं कोर्टाकडे केली होती. कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यासाठी योग्य ती काळजी, खबरदारी कारागृह प्रशासन घेत आहे. त्यामुळे कारागृहातील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले असून कारागृहात आता योग्य प्रमाणात औषधे, इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याचिकाकर्त्या या कारागृहातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे नमूद करत न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. इंद्राणीला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम खटल्यावर होईल, म्हणून त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी भूमिका तपासयंत्रणेकडनं मांडण्यात आली होती.
काय आहे प्रकरण
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती.