(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सायनच्या बारना बास मैदानातील गरब्यासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली
या मंडळाविरोधात 124 स्थानिकांनी तक्रारी दाखल केल्या असून आयोजकांनी 2016 साली अनेक नियमांचे उल्लंघनही केले होते.
मुंबई : गरब्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी नवरात्रीच्या एक दिवस आधी हायकोर्टात धाव घेतलेल्या सायन कोळीवाड्यातील एका मंडळाला मुंबई उच्च न्यायालाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या यंग मॅन असोसिएशन या आयोजकांना गरब्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद पालिका प्रशासनाने हायकोर्टात केला.
मुंबई महापालिका प्रशासनाचा युक्तीवाद ग्राह्य धरत हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावत आयोजकांना परवानगी नाकारली.
गेल्या 11 वर्षापासून सायन कोळीवाड्यातील बारना बास मैदान येथे आम्ही दांडिया रास आयोजित करत असून यंदा पालिकेने गरब्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गरबा आयोजित करण्यासाठी पालिकेने परवानगी द्यावी व तसे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला द्यावेत. या मागणीसाठी यंग मॅन असोसिएशन मंडळातर्फे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
या मंडळाविरोधात 124 स्थानिकांनी तक्रारी दाखल केल्या असून आयोजकांनी 2016 साली अनेक नियमांचे उल्लंघनही केले होते. त्यामुळे आयोजकांना परवानगी देण्यात येऊ नये, असा पालिकेनं केलेला युक्तिवाद मान्य करत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.