पुण्यातील कोरोनाग्रस्तांवर लोणावळ्यातील समुद्र इन्स्टिट्यूटमध्ये उपचार, हॉस्टेल ताब्यात घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
काही दिवसांसाठी जागेचा ताबा देण्याची विनंती राज्य सरकारने समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज संस्थेकडे केली होती. परंतु संस्थेने त्यास नकार देत या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली.
मुंबई : पुण्यातील रेड झोनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर उपाययोजना म्हणून लोणावळ्यातील समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज या संस्थेची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. हा निर्णय योग्यच असल्याचं स्पष्ट करत उच्च न्यायालयानेही याला परवानगी दिली आहे. संस्थेनं सरकारच्या या निर्णयाला विरोध करत हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र रुग्णांच्या उपचारासाठी भविष्यात अपुऱ्या पडणाऱ्या जागेची कमतरता लक्षात घेता सरकारला इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलचा ताबा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता समुद्र इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमधील 192 खोल्यांमध्ये 516 बेडची सोय करण्यात येणार आहे.
लोणावळ्यानजीक टकवे खुर्द येथे समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज ही संस्था असून या संस्थेत मरिन इंजिनिअरिंग तसेच समुद्र अभ्यासबाबत शिक्षण दिले जाते. भविष्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या संस्थेच्या इमारतींचा वापर कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी करता येईल. तेव्हा काही दिवसांसाठी जागेचा ताबा देण्याची विनंती राज्य सरकारने संस्थेकडे केली होती.
परंतु संस्थेने त्यास नकार देत या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा जागा देण्यासाठी विरोध करणाऱ्या संस्थेला हायकोर्टाने फैलावर घेत खडे बोल सुनावले. कोरोनाच्या या संकट काळात नको ती कारणे देऊ नका, प्रत्येकजण अशा प्रकारे विरोध करू लागला तर सरकार उपचार कसे करणार? असा सवाल हायकोर्टानं संस्थेला जाब विचारला. तेव्हा संस्थेने हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली व सरकारला जागा देण्याचे कबूल केले.
राज्य सरकारने या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करत कोर्टाला सांगितले की, मावळमधील हे इन्स्टिट्यूट पुण्याच्या तोंडावर असून या जागेचा वापर पिंपरी चिंचवडमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचं विलिगीकरण करण्यासाठी होईल. इंदोरी येथील टोलानी मेरिटाईम इन्स्टिट्यूट, तळेगाव दाभाडेतील राष्ट्रीय सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्रची जागाही याकामासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता 8 मेपर्यंत पुण्यातील रुग्णांची संख्या साडेसहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
- राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
- महसूल घटल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, विविध विभागात नोकर भरतीवर बंदी
- पुण्यात कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी
- सूरतमध्ये परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; एकदोन गाड्याही पेटवल्या
Lockdown 3 | घरी परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची मोठी घोषणा