एक्स्प्लोर
हायक्लास पाणीचोरी : उच्चभ्रू वैनगंगा सोसायटीसाठी बांधलेल्या छुप्या टाक्या अनधिकृतच
नियमांचं उल्लंघन करत वैनगंगा सोसायटीनं सोसायटीपासून एक-दीड किमी लांब असलेल्या कलेक्टर लँन्डवर दोन ऐवजी 10 हजार लिटरच्या प्रत्येकी चार टाक्या बसवल्या.

मुंबई : वैनगंगा सोसायटीसाठी बांधलेल्या छुप्या टाक्या अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैनगंगा सोसायटीकडून पालिकेच्या परवानगीचा गैरवापर झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रचंड राजकीय दबावानंतर या छुप्या टाक्या अधिकृत ठरवण्यासाठी पालिकेची धडपड सुरु आहे. वरळीतील उच्चभ्रू आणि राजकीय लोकांची वसाहत असलेल्या वैनगंगा सोसायटीला पाणीपुरवठा करणाऱ्या चार छुप्या टाक्या वरळीतल्या डोंगरावर आढळून आल्या होत्या. या टाक्यांमधून वैनगंगा सोसायटीला अतिरिक्त जलजोडण्या टाकण्यात आल्या होत्या. हा प्रकार उजेडात आल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या टाक्यांच्या परवानगीच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु केली. पालिकेनं दिलेल्या परवानगीनुसार वैनगंगा सोसायटीला त्यांच्या परिसरातच 10 हजार प्रति लिटर क्षमतेच्या 2 टाक्या बसवण्याची परवानगी दिली गेली. मात्र, या नियमांचं उल्लंघन करत वैनगंगा सोसायटीनं सोसायटीपासून एक-दीड किमी लांब असलेल्या कलेक्टर लँन्डवर दोन ऐवजी 10 हजार लिटरच्या प्रत्येकी चार टाक्या बसवल्या. एकीकडे अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असतांना छुप्या पद्धतीनं राजकीय नेते आणि उच्चभ्रुंनी केलेल्या पाणीचोरीचा पुन्हा एकदा भांडाफोड झाला आहे. या सोसायटीमध्ये राजकीय नेत्यांसह, उद्योजक आणि बड्या लोकांचा रहिवास आहे.
आणखी वाचा























