Mumbai Rain : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची जोरदार हजेरी
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून दिलसा मिळाला आहे.
Mumbai Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे दिसत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून दिलसा मिळाला आहे. मुंबईत रात्री पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा पावासाचा जोर वाढला आहे. दरम्यान, आजही मुंबईत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
काही भागात वाहतुकीवर परिणाम
मुंबईत झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. कुर्ला-अंधेरी रोडवरील काजूपारा इथेही रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. वाहतूक संथ गतीनं सुरु होती. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला. मुंबईसह राज्यातील इतरही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही काल दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत चांगला पाऊस
महाराष्ट्रात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावासानं हजेरी लावली आहे. 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत राज्यात सरारीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं (Meteorological Department) दिली आहे. सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तिथे सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 814 मिमी पाऊस होत असतो, मात्र, प्रत्यक्षात यावर्षी 957 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यातील सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. सांगलीत सरासरीच्या 21 टक्के कमी पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाली आहे. त्यानंतर नांदेडमध्ये सरासरीच्या 50 टक्के अधिक पाऊस तर नागपुरात सरासरीच्या 47 टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सरासरीच्या 30 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: