कोर्टाचा अवमान प्रकरण: मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संजय राऊतांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
Sanjay Raut : एकाच पक्षाच्या लोकांना कोर्टाचा दिलासा कसा मिळतो, या वक्तव्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. इंडियन बार असोसिएशनने ही कोर्टाचा अवमान झाल्याचे सांगत याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत बचाव निधीचा अपहार केल्याचा आरोप केला होता. सोमय्या यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमय्या पिता-पुत्रांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर सोमय्या पिता-पुत्र भूमिगत होते. सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सोमय्यांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने सोमय्यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याशिवाय मुंबई बँकेत बोगस मजूर प्रकरणी हायकोर्टाने प्रवीण दरेकरांनाही दिलासा दिला.
हायकोर्टाच्या या आदेशानंतर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोर्टाकडून दिलासा मिळत नाही. मात्र, भाजपच्या नेत्यांना दिलासा कसा मिळतो असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता. त्याशिवाय, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातूनही राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला गृहमंत्री वळसे पाटील यांनीदेखील सहमती दर्शवणारे वक्तव्य केल्याचे याचिकादारांनी म्हटले. नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबतच शंका निर्माण करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवून योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे', असे म्हणणेही याचिकादारांनी मांडले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार?
- लोकप्रतिनीधींनी कायद्याचा आदर करायला हवा, विशेष अधिकारांसोबत जबाबदारीही येते याचं भान ठेवा: उच्च न्यायालयचे खडे बोल