(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजस्थान, ओदिशापाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके बंदी? राजेश टोपे प्रस्ताव मांडण्याची शक्यता
राजस्थान, ओदिशापाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके बंदी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आरोग्यमंत्री कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
मुंबई : राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी करणार आहेत.
दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. आज (5 नोव्हेंबर) टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
जगभरात विशेषत: युरोपातील काही देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. त्यामुळे भारतातही दिवाळीनंतर थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यासाठीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडिट कमिटीची बैठक घेतली
देशभरात राजस्थान, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने वायू प्रदूषण असलेल्या 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बुधवारी (4 नोव्हेंबर) नोटीस पाठवली होती.
मुंबई महापालिकेकडून फटाके फोडण्यावर निर्बंध यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेने निर्बंध घातले आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच फटाके फोडा असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. नियमावलीचं उल्लंघन केल्यास मुंबई महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कारवाई होणार आहे.
सध्या महापालिकेने निर्बंध घातले असले तरी राज्य सरकारने फटाके बंदीचा निर्णय घेतल्यास यातही बदल होऊ शकतो.