दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी मागणी हायकोर्टानं फेटाळली
8 जून रोजी मालाडच्या मालवणी परिसरातील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन दिशानं आत्महत्या केली होती. तर त्याच्या ठिक सहा दिवसानंतर सुशांतनं वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी फेटाळून लावली. हा अर्ज दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयानं कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी माहिती उपलब्ध असल्यास संबंधिताने तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांकडे जावे असे स्पष्ट करत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
8 जून रोजी मालाडच्या मालवणी परिसरातील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन दिशानं आत्महत्या केली होती. तर त्याच्या ठिक सहा दिवसानंतर सुशांतनं वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दोघांचाही मृत्यू संशयास्पद असून मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूबाबत सर्व बाजूंनी सखोल तपास केला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करत दिल्लीतील वकील विनीत धंडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
लक्ष्मी विलास बँकेच्या विलनीकरणाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
या सुनावणीवेळी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले, तुम्ही कोण आहात?, या प्रकरणाशी तुमचा संबंध काय?, दिशा सॅलियनच्या मृत्यूमध्ये काही चुकीचे आढळल्यास तिचे कुटुंब कायद्यानुसार योग्य ती पावले उचलतील. जर तुम्हाला या प्रकरणाची माहिती हवी असल्यास किंवा द्यायची असल्यास तुम्ही मुंबई पोलिसांकडे जाऊ शकता असे हायकोर्टाने स्पष्ट केले व ही याचिका फेटाळून लावली.