पोलिसांना गुंगारा देत पळून जाणाऱ्या संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल, शोध सुरु; अटक होणार?
Hanuman Chalisa Row : मनसेच्या आंदोलनादरम्यान संदीप देशपांडे यांनी पळ काढल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यावेळी पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hanuman Chalisa Row : मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात काल (बुधवारी) मनसेनं आंदोलन केलं. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसेच्या आंदोलनादरम्यान संदीप देशपांडे यांनी पळ काढल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यावेळी पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर अटकेची कारवाईही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून संदीप देशपांडेंचा शोध सुरु आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते. अशातच संतोष साळी (Santosh Sali) नावाचा व्यक्ती मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून संतोष साळी हा मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस धक्काबुक्की प्रकरणात संतोष साळी देखील आरोपी आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. अशातच राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघांनीही पोलिसांच्या हातावर तुरी देत तिथून पळ काढला. या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाहीतर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.
दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. अनेक ठिकाणांहून मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काही ठिकाणांहून भोंगे लावून आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.