भिवंडीत अडीच कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नारपोली पोलीस, ठाणे अन्न प्रशासनाची संयुक्त कारवाई
नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना दापोडा येथील सिद्धीनाथ गोदाम कॉम्प्लेक्समधील बी 85 या गोदामात अनधिकृतपणे प्रतिबंधित गुटखा साठविला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथकाने छापा मारला.
मुंबई : महाराष्ट्रात गुटखा बंदी केल्यानंतरही राज्य भरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सर्रासपणे सुरू असून त्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन विभाग आणि पोलीस विभागाने कंबर कसली आहे. तालुक्यातील दापोडा येथील सिद्धीनाथ गोदाम कॉम्प्लेक्समधील गोदामांवर नारपोली पोलीस आणि अन्न प्रशासन विभाग यांनी संयुक्त कारवाई केली आहे. गोदमासह दोन ट्रकमध्ये असलेला तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करून कारवाई केली आहे.
नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना दापोडा येथील सिद्धीनाथ गोदाम कॉम्प्लेक्समधील बी 85 या गोदामात अनधिकृतपणे प्रतिबंधित गुटखा साठविला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथकाने छापा मारला. या गोदामात पान पराग, शिखर, दिलबाग, मनपसंद, कोल्हापुरी यांसह असंख्य नावाने विकला जाणारा गुटखा साठवलेला आढळून आला असता, त्यांनी अन्न प्रशासन विभाग ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना कारवाईसाठी पाचारण केले.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत याबाबत कारवाई सुरू केली असता या गोदाम संकुलात दोन ट्रक संशयास्पद उभ्या असलेल्या आढळून आल्या असता त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये सुध्दा गुटखा आढळून आला. एकूण 2 कोटी 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत माल साठवणूक करणारा मोहम्मद इमरान नुरुद्दीन खान तसेच हा माल साठवणुकीस मदत करणारे गोदाम मालक अमित देवचंद गोसरणी यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. गोदामतील व्यवस्थापक विशाल रघुनाथ मांडवकर ,नागेंद्रकुमार रामसुरत यादव यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ भूषण मोरे यांनी दिली आहे .
दरम्यान, 16 जानेवारी रोजी खारबाव येथे 2 कोटी 75 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्याची कारवाई केली असतानाच पोलीस आणि अन्न सुरक्षा प्रशासन यांनी अडीच कोटींचा गुटखा जप्त करण्याची कारवाई केल्याने बंदी असलेल्या गुटख्याची अनधिकृतपणे साठवणूक व विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे.