Maratha Reservation : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्ते दाम्पत्यांनी चंद्रकांत पाटलांची घेतली भेट, मराठा मोर्चा समन्वयकांचा भेटीवर आक्षेप
मराठा आरक्षणाच्या विरोधातच गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी नेहमी भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या अनेक संघटना आणि सदावर्ते दाम्पत्य यांच्यामध्ये वाद देखील पाहायला मिळतो.
मुंबई: मराठा आरक्षणाबाबत (Maratha Rservation) अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मंगळवारी रात्री मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. चंद्रकांत पाटलांच्या शासकीय निवासस्थानी गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या पत्नीसह भेट घेतली. तत्पूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक देखील चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. मात्र त्यांना न भेटता मराठ्यांचा मारेकरी असलेल्या गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांची भेट चंद्रकांत पाटलांनी का घेतली असा सवाल मराठा मोर्चा समन्वयकांनी उपस्थित केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते या दाम्पत्याने न्यायालयीन लढा दिला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या विरोधातच गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या अनेक संघटना आणि सदावर्ते दाम्पत्य यांच्यामध्ये वाद देखील पाहायला मिळतो.
यातच राज्यात नवीन आलेल्या शिंदे सरकारने मराठा आरक्षणासाठी चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटील आता विरोध करणाऱ्यांशी थेट चर्चा करत असल्याची चर्चा आहे अशी माहिती मिळते. या भेटी संदर्भात चंद्रकांत पाटील आणि सदावर्ते दाम्पत्यांनी बोलण्यास नकार दिलाय. मात्र मंगळवारी रात्री दोन तास बंद दाराआड चर्चा झाली ती नक्की कशा संदर्भात अशा अनेक चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत.
चंद्रकांत पाटील आणि सदावर्ते दाम्पत्य मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांची भेट चंद्रकांत दादा पाटील यांनी का घेतली? ज्यांनी आयुष्यभर मराठा समाजाच्या विरोधात आपली भूमिका मांडली त्यांनी आत्ताच चंद्रकांत पाटलांची का भेट घेतली हे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं असं मराठा क्रांती मोर्चा मराठा राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी म्हटले आहे.