(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa Election Result : गोव्यात भाजपचा विजय, देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबई जल्लोषात स्वागत होणार!
Goa Election Result : गोव्यात देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा पुन्हा चालला हे स्पष्ट झालं. भाजपला गोव्यात विजय मिळवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
मुंबई : गोव्यात भाजपचा विजय झाला आणि देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा पुन्हा चालला हे स्पष्ट झालं. गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज (11 मार्च) मुंबईमध्ये येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सकाळी साडेआठ वाजता मुंबई विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार स्वागत होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता भाजपा प्रदेश कार्यालय येथे देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत होणार आहे, तिथे भाषण करतील आणि त्यानंतर विधानभवनात येतील.
गोवा विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिश: लक्ष घातले होते. गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्याच्या दुसर्याच दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर पदाधिकार्यांना त्यांनी मुंबईला जेवायला बोलावले आणि लगेच सूत्रे हाती घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात विविध राजकीय वादळं घोंगावत असताना सुद्धा एक पाय गोव्यात तर एक पाय महाराष्ट्रात अशी त्यांची स्थिती होती.
सुमारे दीड महिना ते गोव्यात तळ ठोकून होते. गोव्याची जबाबदारी स्वीकारताना उमेदवारांची निवड, अन्य पक्षांतून पक्षात घेतलेले उमेदवार, विविध नेत्यांचे पक्षप्रवेश अशा सार्या बाबींवर त्यांनी व्यक्तिश: लक्ष ठेवले आणि बहुतेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. केवळ उमेदवारांची निवड नाही, तर प्रत्येक मतदारसंघातील प्रचाराची धुराही त्यांनी खांद्यावर घेतली. गोव्यातील 40 ही मतदारसंघात एक प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस यांना दररोज अपडेट देत असे आणि त्याप्रमाणे पुढची रणनीती आखली जाई.
सुमारे 50 हून अधिक सभा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घेतल्या. अगदी छोट्या-छोट्या समूहात कार्यकर्त्यांच्या सुद्धा सभा घेतल्या. बारकाईने काटेकोर नियोजन, प्रचंड आवाका, सूक्ष्म पातळीवर आखणी, संपूर्ण जबाबदारी स्वत: अंगावर घेणे, कुठेही कुणावर विसंबून न राहणे, सातत्याने बारीकसारीक बाबींचा फॉलोअप यामुळेच हा अपेक्षित निकाल लागू शकला. यापूर्वी गोव्यात सलग तीन निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे गोव्याचा स्वभाव आणि रस्ता न रस्ता त्यांना माहिती आहे.
जिथे भाजपाविरोधी लाट आहे, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कमकुवत आहे, अशी वातावरण निर्मिती केली जात होती, तेथे सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून एक मोठा आणि अशक्य वाटणारा विजय देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने 9 मार्च रोजी मुंबई मोर्चा काढला होता. या मोर्चाचं नेतृत्त्व केल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास फडणवीस गोव्याला रवाना झाले होते. गोवा विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ते गोव्यात होत. भाजपने सर्वाधिक 20 जागा मिळवत विजय साजरा केला. त्यानंतर आज सकाळी ते मुंबईत पोहोचणार आहे, यावेळी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल
गोवा - एकूण जागा 40
भाजप - 20
काँग्रेस - 11
आम आदमी पक्ष - 2
गोवा फॉरवर्ड पक्ष- 1
अपक्ष - 3
मगोप - 2
रिवोल्यूशनरी गोअन्स पक्ष - 1