बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट बनवून परदेशात वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आरोपींमध्ये राजू उर्फ फारुख सफी मोल्ला यासह आरोपी श्रुती राजू मोल्ला (26), आरोपी मोहम्मद इमोन मोईन खान (38), आरोपी मोहम्मद सैफुल आलाउद्दीन मोल्ला (36) यांचा समावेश आहे.
ठाणे : बांगलादेशातून आलेल्या घुसखोर महिला आणि पुरुषांचा बनवत कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात पाठवून पैसे कमवणाऱ्या चार जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच बनावट जन्मदाखले, 4 आधार कार्ड, 4 पॅनकार्ड, 4 बांगलादेशातील सिमकार्ड, बांगलादेशातील 2 एटीएम, आणि 12 जणांचे भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. या टोळीतील आणखी गुन्हेगारांचा शोध पोलीस घेत आहेत.
10 ऑगस्ट, 2021 रोजी बंगलादेशी नागरिकांना परदेशी जाण्यासाठी भारतीय बनावटीचे पारपत्र तयार करून देणारा बांगलादेशी घुसखोर विटावा कळवा ठाणे येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ला मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. प्रफुल्ल जाधव आणि त्यांच्या पथकाने विटावा कळवा येथे सापळा रचून आरोपी राजू उर्फ फारुख सफी मोल्ला या मूळच्या बांगलादेशात राहणाऱ्या आणि सध्या गुजरातच्या सुरत येथे वास्तव्यास असलेल्या आरोपीला पकडले. चौकशीत हा आरोपी भारत-बांगला सीमेवरून छुप्या पद्धतीने भारतात दाखल होऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 468, 471, 34 नुसार तसेच पारपत्र नियम 1950 चे कलम 3 (अ), 6 (अ) यासह परकीय नागरिकांचा कायदा 1946 चे कलम 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने तपासासाठी गुजरात गाठून बांगलादेशी असलेल्या 11 नागरिकांची धरपकड केली. कळवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यापैकी तीन आरोपींना ताब्यात घेऊन अन्य 8 आरोपींना सुरत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपींमध्ये राजू उर्फ फारुख सफी मोल्ला यासह आरोपी श्रुती राजू मोल्ला (26), आरोपी मोहम्मद इमोन मोईन खान (38), आरोपी मोहम्मद सैफुल आलाउद्दीन मोल्ला (36) यांचा समावेश आहे. हे आरोपी बांगलादेशातून आलेल्या महिलांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून त्याच्या माध्यमातून परदेशात वेश्याव्यवसायासाठी पाठवीत होते. त्यांनी पासपोर्ट करिता वापरलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे. यात जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, घराच्या भाड्याचा करार, बँक खाते, कर भरणा फाईल अशी बनावट कागदपत्रे बनवून या महिला आणि पुरुष भारताचे पासपोर्ट मिळवायचे. त्याआधारे मलेशिया, मालदीव येथे वेश्या व्यवसायासाठी जाऊन पैसे कमवत होते अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. यातील अटक आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी महिलांना बनावट पासपोर्टवर कुठल्या कुठल्या देशात पाठवले याचा शोध पोलीस पथक घेत आहे. तसेच यात आणखीन बांगलादेशी नागरिक सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.