Veer Savarkar | काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, मनमोहन सिंगांच वक्तव्य
काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
मुंबई : काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, असं मत माजी डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मांडलं आहे. काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांबाबत मतभेद आहेत, मात्र त्यांच्याबाबत आदर असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. मनमोहन सिंग मुंबईत अर्थव्यवस्थेबाबत संवाद साधण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं.
काँग्रेस पक्षापेक्षा जास्त देशभक्त कुणी नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप आणि आरएसएसचं नाव देखील नव्हतं. त्यामुळे काँग्रेसला देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला मनमोहन सिंग यांनी भाजपला लगावला. काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी नाही, म्हणून इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने पोस्टल स्टॅंप सुरु केला होता, अशी माहितीही मनमोहन सिंग यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. यावर बोलताना, भारतरत्न देण्यासाठी एक समिती नेमली जाते आणि ती समिती भारतरत्न कुणाला द्यायचं याबाबत निर्णय घेत असते, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
याआधी काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास तीव्र विरोध केला होता. सावरकरांना भारतरत्न देणार असाल तर नथुराम गोडसेला ही भारतरत्न मिळणार, अशी टीका मनिष तिवारी यांनी केली होती.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 वर बोलताना मनमोहन सिंग यांनी म्हटलं की, कलम 370 हटवण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र ज्या पद्धतीने त्याची अमंलबजावणी झाली, याला आमचा विरोध होता. आता जम्मू काश्मीरच्या नागरिकांच्या सुखसोईंसाठी प्रयत्न केले पाहिजे, असंही ते म्हणाले.