एक्स्प्लोर
संदीप पाटील यांनी नॅशनल पार्कमधील बिबट्या दत्तक घेतला
माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक बिबट्या दत्तक घेतला आहे. या बिबट्याचं नाव तारा असून ती वीस महिन्यांची मादी बिबट्या आहे.
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक बिबट्या माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी दत्तक घेतला आहे. या बिबट्याचं नाव तारा असून ती वीस महिन्यांची मादी बिबट्या आहे. संदीप पाटील आता वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
संदीप पाटील केवळ बिबट्या दत्तक घेऊन थांबले नाहीत. रेस्क्यू केलेल्या, अनाथ असलेल्या सर्व प्राण्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांसाठी येथील डॉक्टर दिवस-रात्र राबत असतात. त्यांच्या टीममध्ये संदीप पाटील देखील सहभागी होणार आहेत.
जगातल्या प्रमुख शहरांमधील अभयारण्यांपैकी सांभाळण्यासाठी सर्वात अवघड असलेले अभयारण्य म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मात्र मुंबईकरांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुंबईकर या अभयारण्यात यावे आणि आपल्या परीने त्यांनी मदत करावी, यासाठी संदीप पाटील काम करणार आहेत.
बिबट्या दत्तक घेणे आता नवीन राहिले नाही, मात्र संदीप पाटील हे एक पाऊल पुढे टाकून अभयारण्यातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार आहेत. त्यामुळे पर्यावरण जागृतीसोबत नवा आदर्शदेखील निर्माण होणार आहे.
संदीप पाटील म्हणाले की, वानखेडेच्या हिरवळीवरुन संजय गांधी उद्यानाच्या घनदाट जंगलात येण्यासाठी शासनाने मला संधी दिली याचा मला खूप आनंद आहे. मला प्राणी आणि निसर्ग दोन्हीची खूप आवड आहे. येत्या काळात मी वनविभागाच्या संपूर्ण टीमसोबत काम करणार आहे. त्याबद्दल उत्सूक आहे. उद्यानातील प्राण्यांसाठी मुंबईतल्या उद्योगपतींनी, सेलिब्रिटींनी पुढाकार घ्यायला हवा. मदत करायला हवी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement