Kishori Pednekar: माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढणार? एसआरए प्रकरणी गुन्हा दाखल
Kishori Pednekar: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Kishori Pednekar: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए (Worli Gomata SRA) प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात (Nirmal Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.
वरळी येथील गोमाता इमारत ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीरपणे या इमारतीमधील सदनिका बळकावल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर महापालिका आणि एसआरए प्राधिकरणाने घर आणि कार्यालय सील केले होते. या कारवाईनंतर किशोरी पेडणेकर यांनी आपला या सदनिकांशी संबंध नसल्याचे म्हटले होते. भाजपच्या राजकारणामुळे मूळ घर मालकांना त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
तक्रारीत काय म्हटले?
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात सहकारी अधिकारी असलेले उदय पिंगळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत सहा इमारती आहेत. सन 2008 मध्ये पात्र झोपडधारकांना या इमारतीमधील घरांचे वाटप करण्यात आले होते. प्राधिकरणाकडे असलेल्या नोंदीनुसार किशोरी पेडणेकर या सोसायटीत झोपडीधारक नव्हत्या आणि त्यांना कोणतीही सदनिका वाटप करण्यात आली नव्हती. तरीदेखील पेडणेकर यांनी सदनिकेचा गैरफायदा घेतला असल्याची तक्रार पिंगळे यांनी केली.
किशोरी पेडणेकरांसह इतरांवर गुन्हा दाखल
वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासह शैला प्रशांत गवस, प्रशांत गवस, गिरीश रेवणकर, साईप्रसाद पेडणेकर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता (IPC) 419, 420,465,468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सोमय्या यांचे आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सातत्याने किशोरी पेडणेकर यांच्या सदनिका बळकावणे आणि फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. एसआरए प्रकरणी आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे चौकशी झाली नसल्याचा आरोप सोमय्या यांनी मागील वर्षी केला होता. त्याशिवाय, किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर आणि त्यांची कंपनी किश कॉर्पोरेटने खोटी दस्ताऐवजे सादर केली असून फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला कोविड काळात नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यात आले होते, असा आरोपही सोमय्यांनी केला होता.