उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल
हिरामन तिवारी यांना मारहाण केल्याप्रकरणी चार शिवसैनिकांविरोधात दादर टीटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हिरामन तिवारीने उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी चोप देत, मुंडन केलं होतं. या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. वडाळा पोलीस स्टेशनमध्ये चार शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरामणी तिवारी या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिक समाधान जुगदार, प्रकाश हंसबे, सत्यवान, श्रीकांत यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात आयपीसी कलम 143, 147, 149, 323, 325, 342, 504, 506, 596 (2) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या मारहाणीविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर आज गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी एफआयआर कॉपी ट्विटरवर शेअर केली आहे.
At last FIR registered by Police against Shivsena Gundas, on Hiramani Tiwari FB issue, IPC Section 143, 147, 149, 323, 325, 342, 504, 506, 596 (2): @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/1VIip6aQUH
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 25, 2019
काय आहे हे प्रकरण?
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने शिवसैनिकांनी हिरामणी तिवारीला चोप दिला होता. नुसती मारहाण नाही तर भर चौकात त्याचे केस कापून मुंडन करण्यात आलं होतं. मुंबईतील वडाळ्यात ही घटना घडली होती. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत होता.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करुन देणारा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात वडाळ्यात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीने फेसबूक पोस्ट लिहिली होती. मात्र त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी मात्र कायदाच हातात घेतला होता.
संंबंधित बातम्या