पुन्हा सेटवर लाइट, साउंड, रोल कॅमेरा अँड अॅक्शन.. आवाज घुमणार!
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरचं प्रेक्षकांना त्यांच्याआवडीच्या मालिका, चित्रपट पाहायला भेटणार आहे.
मुंबई : लाइट, साउंड, रोल कॅमेरा एंड अॅक्शन... हा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येईल. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे आहे. नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सुचना यासाठी लागू राहतील. या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा करावा लागणार आहे.
BLOG | लॉकडाऊन.. शुटिंग आणि कोल्हापूर!
पाळाव्या लागणाऱ्या अटी
- मुख्य कलाकार सोडून केवळ 33 टक्के क्रू सेटवर असावा.
- प्रत्येकाकडे आयकार्ड असावं आणि परवानगी पत्र असावं.
- सेटवर गाईडलाईन्स असाव्यात आणि आपत्कालिन नंबर लावलेले असावेत.
- सोशल डिस्टन्सिंग दर्शवणारे मार्क सेटवर असायला हवेत.
- सेटवर डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका असावी.
- स्वच्छता कर्मचारी प्रशिक्षित असावेत.
- 65 वर्षावरील कोणालाही सेटवर परवानगी नाही.
- सर्वांकडे आरोग्यसेतू अॅप आवश्यक.
- सर्वांचे रोज टेम्प्रेचर चाचणी अनिवार्य.
- कोणी कोव्हिड पॉझिटिव्ह झालेच तर त्याची सर्व काळजी निर्माते, चॅनल यांनी घ्यावी.
- याशिवाय, कास्टिंग करताना, तांत्रिक बाबी हाताळताना काय काळजी घ्यावी तेही देण्यात आलं आहे.