मुंबईतील 18 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, लाखोंचा दंड वसूल, नियमांचं पालन करण्याची FDA कडून तंबी
FDA Action in Mumbai : लोअर परळमधील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंट 'मेराक'वर अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्यानं एफडीएची कारवाई
FDA Action on Hotels in Mumbai: मुंबईतील (Mumbai News) 18 हॉटेल्सवर एफडीएनं (Food and Drug Administration) मोठी कारवाई केल्याची माहिती मिळतेय. यापैकी दोन हॉटेलचे परवानेच एफडीएकडून (FDA) रद्द करण्यात आले आहेत. तसेच, कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सकडून आतापर्यंत एफडीएनं 1 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये चिकन डीशमध्ये उंदीर सापडल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर एफडीएनं याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करण्यात सुरुवात केली होती.
लोअर परळमधील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंट 'मेराक'वर अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्यानं एफडीएनं कारवाई केली आहे. तसेच, अन्नसुरक्षेच्या संदर्भातील नियमावलीचं पालन करण्यासाठी हॉटेलला दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. या वेळेत दिलेल्या सूचनांचं पालन न झाल्यास एफडीएकडून पुढील कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईतील 18 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातल्या दोन हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे. तसेच या पुढेही अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरू राहणार आहे.
दक्षिण मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये चिकन डीशमध्ये उंदीर सापडल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच, स्वच्छतेच्या निकषांबाबत अनेक ठिकाणांहून तक्रारी येत असल्याचं आता उघड झालं आहे. आतापर्यंत या हॉटेल्सकडून एफडीएनं 1 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
FDA कडून दीडशेहून अधिक हॉटेल्सची तपासणी
अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दोन महिन्यांमध्ये दीडशेहून अधिक हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 137 ठिकाणी अन्नपदार्थांच्या दर्जाशी संबधित तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 136 ठिकाणी किचनची स्वच्छता आणि गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचं दिसून आलं आहे. याव्यतिरिक्त तब्बल सोळा हॉटेल्स कोणत्याही परवान्याशिवाय सुरू असल्याचं एफडीएच्या तपासात समोर आलं आहे.
मोठ्या हॉटेल्सकडून स्वच्छता धाब्यावर
एफडीएकडून करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत मोठ्या हॉटेल्सकडून स्वच्छता धाब्यावर बसवण्यात आल्याचं समोर आलं आहे. तसेच, या हॉटेल्सकडून एफडीएकडून आखून देण्यात आलेल्या नियमांचंही सर्रास उल्लंघन होत असल्याचं उघड झालं आहे. याव्यतिरिक्त अनेक हॉटेल्सच्या किचनमध्ये कचरापेट्या उघड्यावरच ठेवण्यात आल्याचं दिसून आलं. तर काही हॉटेल्समध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आलेल्या नसल्यामुळे आरोग्य प्रमाणपत्र देण्यात आलं नसल्याचं दिसून आलं आहे.