पालघरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने अंत; आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन
पालघरच्या ठाकरे कुटुंबातील आई-वडील, त्यांचा 34 वर्षीय मुलगा, सून आणि नातवंड एकामागून एक कोरानाबाधित झाले होते. आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर वीस दिवसात वडिलांचं निधन झालं. ठाकरे कुटुंबातील तिघांचा कोरोनाने अंत झाला.
पालघर : एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. आई-वडील आणि तरुण मुलाचा कोरोना संसर्गानंतर मृत्यू झाला. सुदैवाने सून आणि नातवंडं कोरोनावर मात करुन घरी परतली. मात्र पतीसह सासू-सासऱ्यांचं छत्र हरपल्याने महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ऐनशेत गावात ही घटना घडली. ठाकरे कुटुंबातील आई-वडील, त्यांचा 34 वर्षीय मुलगा, सून आणि नातवंड एकामागून एक कोरानाबाधित झाले होते. सर्वांवर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते.
आई सविता ठाकरे यांचा 11 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यानंतर 34 वर्षीय मुलगा सागर ठाकरेने 22 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. तर मृत्यूशी झुंज देत असताना 1 मे रोजी वडील सदानंद ठाकरे यांनीही प्राण सोडले. संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून या महामारी मोठ्या प्रमाणात तरुण आणि वृद्ध बळी पडत असून अपुऱ्या सुविधांअभावी त्यांना प्राण गमवावे लागत आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड भागात जास्त कोरोनाबधित असून गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात या महामारीने बळी घेतले.