(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : आनंद दिघेंनी राज ठाकरेंचं कौतुक केलं, उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखायला सुरू झालं; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा
Eknath Shinde Shivsena Dasara Melava : आनंद दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची संपत्ती किती आणि कुठे आहे असं उद्धव ठाकरेंनी विचारल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई : एकदा का उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठरवलं की एखाद्याचा काटा काढायचा तर ते काढतातच, मी त्याचा साक्षीदार आहे. आनंद दिघेंनी (Anand Dighe) एकदा राज ठाकरेंचे (Raj Thackeray) कौतुक केलं आणि उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखायला लागले अशी आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. 26 जुलै 2005 सालच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेऊन तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलात गेलात. तुम्ही बाळासाहेबांचे होऊ शकला नाहीत आमचे काय होऊ शकता असा सवालही त्यांनी विचारला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, राज ठाकरे हे शिवसेनेत असताना चांगलं काम करत होते. त्यावेळी राज ठाकरेंचं काम पाहून त्यांच्याबद्दल धर्मवीर आनंद दिघेंनी दोन शब्द चांगले बोलले, लगेच उद्धव ठाकरे यांच्या पोटात दुखायला सुरू झालं. त्यानंतर आनंद दिघे यांचे पंख छाटण्याचं काम सुरू केलं, मी त्याचा साक्षीदार आहे. आनंद दिघेंचा अपघात झाला, त्यावेळी त्यांना पाहायला ते आले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतरही आले नाहीत. आनंद दिघेंच्या समाधीलाही ते आले नाहीत. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी मला विचारलं की आनंद दिघेंची संपत्ती कुठे आहे? आनंद दिघे फकीर माणूस, आयुष्यभर समाजासाठी राबले. त्यांच्याबद्दल हे असे वागले.
आज तिकडे जमा झालेत, छाती बडवून सांगतात की मर्द आहोत. मर्द आहोत हे का सांगावं लागतंय. ही सभा बाळासाहेबांच्या मर्द मावळ्यांची आहे. तिकडे हुजरेगिरी करणाऱ्या कारकुनांची आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले
पवारांकडे दोन माणसं पाठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा असं त्यांना सांगितलं. 2004 सालापासून त्यांना ही इच्छा होती, पण जुगाड काही लागत नव्हता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातलं पाणी पण हलू दिलं नाही. शेवटपर्यंत त्यांनी समजू दिलं नाही. सितेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले.
मराठा समाजाला आरक्षण देणार
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपली असताना त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. भाषण सुरू असताना एकनाथ शिंदे मध्येच थांबले आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यासमोर नतमस्तक होऊन त्यांनी मराठा आरक्षण देणार असल्याचं सांगितलं. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना मी आरक्षण देणारच. आपली समिती जी आहे ती काम करतेय. सर्वोच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे. कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार, या एकनाथ शिंदेच्या शरीरात शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी काम करणार असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ही बातमी वाचा: