डीजेबंदीमुळे विसर्जन मिरवणुकीच्या ध्वनी प्रदूषणात घट
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत सांताक्रुझ येथे सर्वाधिक 113.9 डेसिबल आवाजाच्या पातळीची नोंद झाली. गेल्यावर्षींची सार्वाधिक पातळी ही 119.8 डेसिबल इतकी होती.
मुंबई : डीजेबंदीचा सकारात्मक परिणाम झाल्याचं सिद्ध झालं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्यात ध्वनीप्रदुषण कमी झाल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.
मात्र, तरीही मुंबईसह पुणे आणि नाशिकमध्ये पारंपारिक वाद्यांमुळे विविध ठिकाणी आवाजाची कमाल पातळी ओलांडण्यात आल्याचंही आवाज फाऊंडेशननं हायकोर्टात सांगितलं. विविध उत्सवाच्या निमित्याने होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वर्भूमीवर सामाजिक संस्था आवाज फाऊंडेशन तसेच अन्य काहींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
बुधवारच्या सुनावणीत यंदाच्या वर्षी गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूकीत गतवर्षीच्या तुलनेत ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण कमी झाल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टाला देण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत सांताक्रुझ येथे सर्वाधिक 113.9 डेसिबल आवाजाच्या पातळीची नोंद झाली.
यंदाची आवाजाची पातळी ही गतवर्षीच्या तुलनेत 6 डेसिबलने कमी झाली असल्याचेही याचिकाकर्त्यांनी मान्य केले. गेल्यावर्षींची सार्वाधिक पातळी ही 119.8 डेसिबल इतकी होती. मात्र, मुंबईसह पुणे, नाशिक येथे अनेक ठिकाणी पारंपारिक वाद्य असलेल्या ढोल, ताशे, बॅन्जो हे अॅम्प्लिफायरसोबत लाऊडस्पिकरला जोडल्यामुळे आवाजाची पातळी ओलांडली गेल्याचं त्यांनी हायकोर्टात सांगितलं.
दुसरीकडे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर इतर सार्वजनिक मंडळांनी पारंपारीक वाद्ये वाजवण्याचे थांबविल्यानंतरही काही राजकीय पक्षांनी पुरस्कृत गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांसमोर रात्री एक वाजेपर्यंत लाऊडस्पिकरवर ढोल, ताशे आणि बॅन्जो वाजवल्याची माहिती हायकोर्टाला दिली. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने याबाबत पोलीस प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश देत, सुनावणी 24 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.