14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार
अजित पवारांनी आधी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी इंदू मिल इथं जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाची पाहाणी केली. त्यावेळी बोलताना 14 एप्रिल 2022 पर्यंत इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यावेळी घेतलेल्या पत्रकरा परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 'इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाविषयी आपण माहिती घेतली, स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार असून या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार आहोत. तसेत सर्व अडचणी दूर करुन स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.'
स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाहीसुद्धा अजित पवारांनी दिली आहे. अजित पवारांनी आधी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी इंदू मिल इथं जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत.
मंत्रालयातील नकोशा दालनाबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण
मंत्रालयातील दालन क्रमांक 602 स्वीकारण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिल्यामुळे हे दालन अपशकुनी असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार कुटुंबीय कोणतीही अंधश्रद्धा पाळत नाही. 20 व्या शतकात कोणीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. तसेच 602 क्रमांकाचे दालन नाकारले नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील अशा क्रमाने सर्वांना दालनं देण्यात आली आहेत. याआधी तिथे दोन, तीन मंत्री राहून गेले आहेत. त्यामुळे असा समज करण्याचा काही अर्थ नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
शिवस्मारकाचं काम माझ्याकडे नाही
दरम्यान, यावेळी त्यांना शिवस्मारकाच्या कामाबाबतही विचारणा करण्यात येईल. शिवस्मारकाचं काम माझ्याकडे नाही. त्याबाबत एजन्सी नेमली आहे. या एजन्सीसोबत चर्चा करून कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्नही लवकर निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली. पोलिसांच्या घराबाबत आज सायंकाळी पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
शिवभोजन थाळीसाठी सबसीडी देणार
शिवभोजन थाळीचा उपक्रम राज्यात 50 ठिकाणी पहिल्यांदा राबवण्यात येत आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 36 ठिकाणी तर मोठ्या जिल्ह्यांमध्ये जास्त ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला असून 10 रुपयात ही थाळी नागरिकांना मिळणार आहे. पण तसं पाहता 10 रूपयांत पोषक आहार देणं शक्य नाही. त्यामुळे शासनाकडून त्यासाठी सबसीडी देण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
मला त्यांच्यात लुडबूड करण्याचं कारण काय?
एकनाथ खडसेंनी फडणवीस आणि महाजनांवर आरोप केला होता. माझं राजकारण संपवण्याचा डाव त्यांनी जाणीवपूर्वक आखला, असं खडसे म्हणाले होते. याबाबत विचारल्यावर 'त्यांच्या पक्षात कोणाला तिकीट द्यायचं हा त्यांचा निर्णय आहे, मला त्यांच्यात लुडबूड करण्याचं कारण काय? असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीबाबत काय असेल तर ते विचारा असं पत्रकारांना सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
EXCLUSIVE : खातेवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नाही तर आघाडीतील पक्षांकडून उशीर, संजय राऊतांचा दावा
महाविकास आघाडीचं खातेवाटप ठरलं; संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती