Double Decker Electric Bus: खुशखबर! मुंबईत लवकरच धावणार 'डबल डेकर इलेक्ट्रिक बस'
Mumbai Double Decker Electric Bus: मुंबईत लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस सुरू होऊ शकतात.
Mumbai Double Decker Electric Bus: मुंबईत लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस सुरू होऊ शकतात. मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 7 ऑगस्ट रोजी बेस्टच्या स्थापना दिनानिमित्त लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. एका अहवालानुसार, मुंबईतील डबल डेकर बसची संख्या 2019 मध्ये 120 वरून 2021 मध्ये केवळ 48 वर आली आहे. हे पाहता शहरातील सर्वात जुने वाहतूक माध्यम सुरक्षित ठेवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.
बेस्टच्या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची तयारी सुरू आहे. यासाठी राज्य सरकार 900 इलेक्ट्रिक बस खरेदी करत आहे. 2028 पर्यंत शहरात चालणाऱ्या सर्व डिझेल बसेस इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची सरकारची योजना आहे. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, बेस्टच्या सर्व बस एकतर पूर्णपणे इलेक्ट्रिकवर धावतील किंवा त्या हायड्रोजन इंधन सेलवर चालवल्या जातील. कोणत्या माध्यमाने बसेस चालवणे अधिक सुरक्षित आणि कमी खर्चिक असेल हे यावर अवलंबून असेल.
मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार बेस्टमध्ये नवीन बसेस समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. शहरात दररोज 31 लाख प्रवासी बसने प्रवास करतात. येत्या एक ते दोन वर्षांत प्रवाशांच्या संख्येत आणखी 1 ते 2 लाखांनी वाढ होऊ शकते. सरकारने यापूर्वीच 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसना मान्यता दिली आहे. ज्यामध्ये या वर्षअखेरीस 225 बसेस धावताना दिसू शकतात. तसेच पुढील 225 बसेस मार्च 2023 मध्ये आणि उर्वरित 450 बसेस जून 2023 मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल.
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे की, 2025 पर्यंत मुंबईतील 15 टक्के बसेस इलेक्ट्रिकमध्ये बदलल्या जातील, परंतु बेस्टने 2025 पर्यंत 50 टक्के बसेस इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे सांगितले आहे. इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठी 55 भागात चार्जिंग स्टेशन बांधले जात आहेत. हे चार्जिंग स्टेशन्स सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत बांधली जात आहेत. येत्या 3-4 महिन्यांत मुंबईत अशी अनेक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स तयार होतील. या स्थानकांवर लोक त्यांच्या इलेक्ट्रिक कार, बाईक किंवा स्कूटर देखील चार्ज करू शकतील.
जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रचा समावेश करण्याचा उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवला आहे. यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. मार्च 2025 पर्यंत सर्व नवीन वाहन नोंदणींमध्ये 10 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष असलेल्या EV धोरणासाठी सरकारने 930 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Electric Tractor: लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक येणार, नितीन गडकरी यांची घोषणा