मुंबईतील उघड्या गटारीत पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध थांबवला, महापालिकेची माहिती
दिव्यांशला शोधण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो सापडला नाही. एक क्षण नजर चुकवून घराबाहेर आलेला दिव्यांशवर ही वेळ ओढवेल असे कुणाला वाटले नव्हते.
मुंबई : मुंबई उपनगरातील गोरेगावमध्ये उघड्या गटारीत पडलेल्या चिमुकल्या दिव्यांश सिंहचा शोध थांबवण्यात आला आहे. 48 तास उलटून गेल्यानंतरही गटारीत वाहून गेलेला दिव्यांश सिंह सापडला नाही. त्यामुळे नाईलाजाने मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिका आपत्कालीन विभागाने ही शोधमोहिम थांबवली आहे.
गेल्या 48 तासांत अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 किमीच्या परिसरातील ड्रेनेज लाईन, मॅनहोल या ठिकाणी दिव्यांशचा शोध घेतला. एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले होते. शोध मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात ड्रोन कॅमेऱ्यानेही दिव्यांशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दिव्यांश न सापडल्यानं अखेर ही शोधमोहिम थांबवत असल्याचं मुंबई महापालिका आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
बुधवारी 10 जुलैच्या रात्री ही दुर्दैवी घटना घडली. गोरेगाव पूर्वेच्या आंबेडकर चौक येथील चाळींमध्ये दिव्यांशचे कुटुंब राहते. बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास दिव्यांश घरातून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या नाल्यात पडला आणि वाहून गेला. त्याआधी मुसळधार पाऊस पडून गेला होता, त्यामुळे नाल्यात पाण्याचा प्रवाह जोरात होता. दिव्यांशला शोधत आलेल्या त्याच्या आईला तो कुठे दिसला नाही, म्हणून शोध घेतला असता, सीसीटीव्ही मधून तो नाल्यात पडल्याचे समोर आले.
दिव्यांशला शोधण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो सापडला नाही. एक क्षण नजर चुकवून घराबाहेर आलेला दिव्यांशवर ही वेळ ओढवेल असे कुणाला वाटले नव्हते.