OBC Reservation : ओबीसी बैठकीत भुजबळ आणि अजित पवारांमध्ये मतभेद, भुजबळांनी सादर केलेली आकडेवारी अजित पवारांना अमान्य
OBC Reservation : ओबीसी आरक्षणानुसार शासकीय नोकरीबाबत आकडेवारीवरुन छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
मुंबई : ओबीसींच्या (OBC) मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं सध्या समोर येत आहे. कारण या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणानुसार शासकीय नोकरीबाबत आकडेवारी सादर करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी ही आकडेवारी सादर केली. ही आकडेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमान्य केल्याचं समोर येतय.
सह्याद्री अतिगृहावर बोलवण्यात आलेल्या या बैठकीमध्ये ओबीसी महासंघाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या बैठकीसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली. तर या बैठकीमध्ये ओबीसींच्या विवध मागण्यांवर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मतभेदाचं नेमकं कारण काय?
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात येतेय. दरम्यान या बैठकीमध्ये ओबीसीचे नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या छगन भुजबळांनी काही मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी ज्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण आहे त्याप्रमाणात शासकीय नोकरभरती होत नसल्याचा मुद्दा छगन भुजबळ यांनी मांडला. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'जर ओबीसींसाठी सव्वा पाच लाख जागा असतील तर त्या तितक्या भरल्या गेल्या नाहीत. उलट खुल्या प्रवर्गातून जास्त प्रमाणात भरती करण्यात आली आहे.' त्यामुळे जर खुल्या प्रवर्गासाठी सव्वा पाच लाख जागा असतील तर त्या सव्वा सहा लाख कशा भरल्या गेल्या, असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांचे हे सगळे मुद्दे या बैठकीमध्ये खोडून काढले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'भुजबळांनी ही सगळी माहिती दिल्यानंतर मी मुख्य सचिवांशी चर्चा केली. त्यांनी मला सगळी माहिती देखील. असा कोणत्याच पद्धतीची भरती झाली नाही. त्यामुळे या आकड्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही.' तर या आकडेवारीचा तपशील आम्ही सातत्याने घेत असतो आणि ही अधिकृत आकडेवारी असल्याचं भुजबळांनी म्हटलं.
राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांचे एकाच मुद्द्यावर मतभेद
हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. तर भुजबळांचा रोख हा खुल्या प्रवर्गातून जास्त जागा भरल्या गेल्याकडे होता हे देखील या बैठकीमध्ये पाहायला मिळालं. दरम्यान आता यावर कोणता निष्कर्ष निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Rahul Gandhi : राहुल गांधींकडून नोकऱ्यांमधील ओबीसींच्या प्रमाणाचा मुद्दा तर अमित शाह म्हणतात...