(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रभू रामचंद्रांचे पण असे स्वागत झाले नसेल, हा दिखावा कशासाठी? पोहरादेवीतील गर्दीवरुन दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा सवाल
पोहरादेवीच्या दर्शनसाठी गेलेल्या संजय राठोड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला त्यांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली. यावर निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट लिहीत कोरोनाच्या काळात अशी गर्दी योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केलाय.
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुडूंब गर्दी केली होती. राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर होत असताना अशी गर्दी करणे योग्य आहे का? असा संतप्त सवाल निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी विचारला आहे. नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर परखड भूमिका घेणाऱ्या टिळेकर यांनी यावेळीही खडेबोल सुनावले आहेत. फेसबुक पोस्ट लिहीत टिळेकर यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
काय म्हणाले महेश टिळेकर? नियमांचे उल्लंघन करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणारे समर्थक कोरोना कोळून पिल्यासारखे आपल्या नेत्याच्या नावाने बेंबीच्या देठापासून घोषणा देताना पाहून नेत्यांची छाती अभिमानाने फुलत असेल, पण ह्या येड्यांच्या भरलेल्या बाजारामुळे किती जणांच्या जीवाचा खेळ होतोय याची कल्पना संबंधित नेत्याला नसावी का?
Sanjay Raut : आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, पोहरादेवी येथील गर्दीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया युद्धात पराक्रम गाजवून आलेल्या एका वीर योद्ध्याचे होत नसेल असे असे स्वागत या नेत्यांचे भक्त चेले असणारे समर्थक करताना पाहून वाटतं की 14 वर्षांचा वनवास संपवून आलेल्या प्रभू रामचंद्रांचे पण असे स्वागत झाले नसेल. हा दिखावा कशासाठी तर आरोप झालेल्या एखाद्या प्रकरणातून सहिसलामत सुटण्यासाठी लोकांची सहानुभूती मिळाली तर निकाल आपल्या बाजूने लागेल म्हणूनच ना? पण मग यासाठी मंदिरातील देवाला वेठीस धरून स्वतः चा स्वार्थ साधून घेण्याचा हा डाव म्हणजेच राजकारण का?आपल्या नेत्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले असताना प्रकरणाचा पूर्ण निकाल लागेपर्यंत वाट न पाहणारे अतिउत्साही कार्यकर्ते कोरोना सारखी गंभीर परिस्थिती असताना आपला नेता कसा आदर्शवादी महात्मा आहे हे समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न करताना पाहून कोरोनाला ही फाट्यावर मारणारे हे समर्थक, कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आज आपण आहोत अश्या महापुरुषांचा कुणी अपमान करतात तेव्हा का नाही लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरत?, असा सवालही महेश टिळेकर यांनी उत्साही कार्यकर्त्यांना विचारला आहे.
काय आहे प्रकरण? पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी इथे पोहोचले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीत कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही.