Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray Thane Speech : भाजपवाले जे डाव रचत आहेत त्याच्याविरोधात इथल्या गुजराती समाजाने उभे राहिले पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. त्यावेळी त्यांनी उद्योगपती अदानींवर टीका केली.

मुंबई : माझा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही, पण सगळे उद्योग एकाच उद्योगपतीकडे का? त्या उद्योगपतीच्या आडून मराठी ठसा पुसण्याचं काम केलं जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुंबई विमानतळ अदानीने ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी गरबा खेळण्यात आला. त्या माध्यमातून मराठीची ओळख पुसून टाकण्याचं काम करण्यात येत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. ही मुंबई आहे, वाजवायचं असेल तर ढोल आणि लेझीमच वाजली पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरे ठाण्यातील संयुक्त सभेत बोलत होते.
मुंबई-ठाण्याचं मराठीपण पुसून टाकण्याचं काम सुरू आहे, पण मुंबई-ठाणे हे आपलं आहे. विकास तर करणारच, पण आधी स्वाभिमान महत्त्वाचा असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Thane Speech : राज ठाकरेंचे भाषण खालीलप्रमाणे,
भाजपवाले पैसे वाटतात आणि शिंदेंची माणसं त्यांना पकडून मारतात असं चित्र दिसतंय. मताला पाच पाच हजार रुपये वाटले जात आहेत. एका बाजूला विकास केला असं म्हणतात, मग पैसे का वाटावं लागतंय? मला देणाऱ्यांची चिंता नाही तर घेणाऱ्यांची चिंता आहे. उद्या यांची मुलं काय म्हणतील, आमचे आई-वडील विकले गेले.
कल्याण डोंबिवलीमध्ये गुलामांचा बाजार माडतात तसा बाजार मांडला गेला. एकाने तर एबी फॉर्म गिळून टाकला. सोलापुरात आमच्या एका उमेदवाराचा खून झाला. पोलीस हताश झालेत आणि कोर्टाचं तर या विचारायलाच नको.
तिघांना पाच कोटींची ऑफर
शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक हे एकाच कुटुंबातील तिघेजण कल्याणमध्ये उभारले आहेत. त्यांना 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती. तरीही 15 कोटींची ऑफर नाकारून ते तिघेही निवडणुकीला उभे राहिले. दुसरे उमेदवार, राजश्री नाईक... त्यांना पाच कोटींची ऑफर देण्यात आली. सुशील आवटे यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, ती त्यांनी नाकारली.
कुठून येतो हा पैसा, काय चाललंय? हे फक्त दोन तीन जण समोर आले आहेत, यांना देण्यासाठीचे पैसे कुठुन येताहेत? इतकी वर्षे आम्ही निवडणूक पाहतोय, अशी निवडणूक पाहिली नाही.
अक्षय शिंदेंचा एन्काऊंट का केला?
बदलापूरमधील शाळेमध्ये एकाला पकडलं आणि त्याला एन्काऊंटरमध्ये ठार मारलं. त्याला ठार का मारलं? काही गुपीत होतं का? त्यात ज्याच्यावर बलात्काराचा आरोप असलेल्या आपटेला स्वीकृत नगरसेवक बनवलं. आम्ही आवाज उठवल्यानंतर त्याचा अर्ज मागे घेण्यात आला.
देवेंद्र फडणवीस या माणसाला काय झालं ते माहिती नाही. आला त्यावेळी तो बरा होता. तो अण्णामलाई स्वतः सांगतोय, मुंबई महाराष्ट्राची नाही. पण फडणवीस म्हणतात की, तो तसा बोललाच नाही, त्याचा अर्थ तसा नाहीच. कुणासाठी करताय हे तुम्ही, कशासाठी करताय हे? हे फक्त हातावर बसलेले ससाणा आहेत, ते जाऊन पक्षी मारताहेत. आमचेच लोक आमचा घात करतात.
एकाच उद्योगपतीकडे सगळं दिलं जातंय
गौतम अदानी यांनी फक्त नवी मुंबई विमानतळ आणि मुंद्रा बंदर बांधलं आहे. पण त्यांनी देशातील सगळी विमानतळं गन पॉईंटवर ताब्यात घेतली आहेत.
इंडिगोच्या विमानामध्ये आंदोलन झालं होतं. देशातील 62 टक्के हवाई वाहतून इंडिगोच्या हाती आहेत. त्याने एक दिवस वाहतूक बंद केली, सगळा देश वेठीस धरला गेला, सगळं ठप्प झालं. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते, मग आज अदानीच्या हातात सिंमेंट, बंदरं, विमानतळं असं सगळं काही आहे. या देशात तुमचं भविष्य गौतम अदानी ठरवणार. अदानी फक्त दहा वर्षामध्ये मोठा झाला.
या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत, त्याला माझा विरोध नाही. मी त्याच्या विरोधात नाही. पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहेरबानी का असं विचारतोय. त्या माणसाला पुढे करायचा आणि आपले डाव साधायचे. वाढवणच्या पुढे गेला तर लगेच गुजरात लागतं. आपल्या शहरांवरचा मराठी ठसा यांना पुसायचा आहे.




















