धनंजय मुंडे प्रकरणी सखोल चौकशी होणे आवश्यक, संजय राऊत यांची मागणी
पोलीस आणि कायदा त्यांचे काम करीत असतात. कायद्याच्या वर कोणी नाही. पण विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करेल आणि कुणाचा राजीनामा घ्यावा या वृत्तीचा बिमोड व्हायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
मुंबई : धनंजय मुंडे प्रकरणात घाईघाईत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. सर्वाधिकार सरकारचे असतात. काही लोकांनी ठरवलंय, तेच कायदा आहेत. कोणाला आरोपी करायचे, शिक्षा करायच्या, कुणाला दोषी ठरवायचे. या प्रवृत्तींना उत्तेजन मिळता कामा नये त्यामुळे अशा प्रकरणांची खोलात जाऊन चौकशी होणं गरजेचं आहेस. या प्रकरणाला कालपासून कलाटणी मिळाली आहे. तेच प्रकरण जास्त गंभीर वाटतंय. तक्रारदार व्यक्तिविरुद्धच गंभीर आरोप आहेत, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
हनीट्रॅप प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हता. या प्रकाराचे राजकारण गेल्या वर्षभरात वाढलंय, बदनाम करायचे, चिखलफेक करायची. मात्र यात व्यक्तीची नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची बदनामी होतेय. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये या मताचा मी आहे आणि सगळ्यांचीही तीच भावना आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
विरोधी पक्षाने संयम आणि भान ठेवण गरजेचं
पोलीस आणि कायदा त्यांचे काम करीत असतात. कायद्याच्या वर कोणी नाही. पण विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करेल आणि कुणाचा राजीनामा घ्यावा या वृत्तीचा बिमोड व्हायला हवा. काचेच्या घरात राहणाऱ्यानी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत. एखादा दगड तुमच्या घरावर पडेल तर तुमचाही ताजमहाल कोसळेल. मंत्र संपूर्ण देशाच्या राजकारणासाठी आहे. बेताल झालेल्या विरोधी पक्षाने संयम आणि भान ठेवण गरजेचं आहे. कधी काळी तेही सत्तेत होते. हमाम मे सब नंगे होते है, या वाक्याचे भानही ठेवावे. नितीमत्ता कुणी कुणाला शिकवू नये. आम्ही जर खातेवही उघडली तर त्रास होईल. धनंजय मुंडे यांना याक्षणी संरक्षण मिळणे गरजेचे आहे. आणि त्यांनी जी आरोप केले आहेत त्याचीही निःपक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे, असं संजय राऊत म्हणाले.
...तर विरोधी पक्षाच्या पोटात का मुरडा उठतोय?
शरद पवार पोलीस अधिकाऱ्यांना भेटले यावरुन झालेल्या टिकेवर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, शरद पवार कुठल्या दुसऱ्या राज्यातले नेते आहेत का? शरद पवार सरकारचे मार्गदर्शक नेते आहेत. शरद पवार यांच्या प्रेरणेतून सरकार बनले आहे. गंभीर प्रकरणावर पवार साहेबांनी पोलिसांना बोलवून माहिती घेतली असेल तर विरोधी पक्षाच्या पोटात का मुरडा उठतोय? जे संविधानिक पदावर बसले आहेत ते त्या पदाचे किती पालन करीत आहेत? राज्यपालांनी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणूका अद्याप का केल्या नाहीत? जे संविधानिक आहे. त्यावर विरोधी पक्ष बोलणार आहे का? त्यांनी आपण किती घटनेनुसार वागत आहोत याचा खुलासा करावा.
देवेंद्र फडणवीस यांच्या संयमी भूमिकेचं स्वागत
देवेंद्र फडणवीस हे राज्यकर्ते होते, ते विरोधी पक्षनेते आहेत. या प्रकरणात त्यांची भूमिका अत्यंत संयमी आहे. मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. आंदोलन करण्याची किंवा राजीनामा मागणाऱ्या गटाची भूमिकेचे काय करावं हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवावं. मी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका त्यांच्या पक्षाची भूमिका मानतो.
संबंधित बातम्या
- 'मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय', धनंजय मुंडे प्रकरणातील तक्रारदार महिलेचं ट्वीट
- महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नी नसते'; श्रीनिवास पाटील यांची कोपरखळी
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?
- धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, भाजपची मागणी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार
- कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील