बलात्काराची धमकी देऊन पाच कोटींची मागणी, धनंजय मुंडे यांची महिलेविरोधात पोलिसात तक्रार
बलात्काराची धमकी देऊन संबंधित महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
मुंबई : एका परिचित महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्याची तक्रार नोंदवली आहे. बलात्काराची धमकी देऊन संबंधित महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर मलबार पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेला वर्ग करुन तपासाला सुरुवात झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, "फेब्रुवारी ते मार्च महिन्यात संबंधित महिलेने आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन करुन पाच कोटींचं दुकान आणि महागड्या मोबाईल फोनची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली होती."
धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईल फोनही कुरिअरद्वारे पाठवला होता. मात्र यानंतरही संबंधित महिला आणखी पाच कोटी रुपयांच्या ऐवजाची मागणी करत होत. मग मात्र धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.
दरम्यान ही महिला धनंजय मुंडे यांच्या परिचयाची असल्याचं समजतं. पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवलं असून आता या चौकशीत काय समोर येतं हे पाहावं लागेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय', धनंजय मुंडे प्रकरणातील तक्रारदार महिलेचं ट्वीट