अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये : संदीप देशपांडे
जे मास्क लावत नव्हते त्यांना कोरोना झाला, असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला होता. त्यावर उत्तर देत संदीप देशपांडे म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी अर्धवट माहितीवरुन बोलू नये.
कल्याण : मास्क वापरत नव्हते, दुसऱ्यांदा कोरोना झाला आणि आता ऑपरेशनही रखडलं, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री मास्क घालून फिरतात त्यांनाही कोरोना झाला. राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही, त्यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स आढळले आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
राज ठाकरेंना कोरोना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिप बोनवर 1 जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती. परंतु राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झाल्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
अजित पवार काय म्हणाले होते?
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरुन नागरिकांना सावध करताना अजित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता. मास्क लावण्याचा विचार करावाच लागेल कारण जे मास्क लावत नव्हते त्यांना कोरोना झाला. अजित पवार म्हणआले काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. ऑपरेशन करायला गेले आणि कोरोना झाला. आता दिवस वाया गेले की नाही."
प्रत्येक वेळी हिंदूंनी गोळ्याच खायच्या का? संदीप देशपांडे
काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांचं हत्या सत्र सुरु आहे. याबाबत संदीप देशपांडे यांनी सरकारकडे तेथील हिंदूंना बंदुका, बंदुकांचे परवाने द्या अशी मागणी केली. याबाबत बोलताना देशपांडे यांनी त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे. हिंदूंनी काय फक्त बघत बसायचा का? असा सवाल केला. पुढे ते म्हणाले की, "हिंदूंना स्वसंरक्षणाचा अधिकार नाही का? हिंदूंना मारणाऱ्यांकडे विनापरवान्याचे शस्त्र असतील तर आम्हाला बंदुका आणि परवाने द्या, स्वसंरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येकाला घटनेने दिलेला आहे. प्रत्येकाला संरक्षण देणे केंद्र सरकारला शक्य नसेल तर बंदुका तरी द्या. प्रत्येक वेळी हिंदूंनी काय गोळ्याच खायच्या का?"
आम्हाला चिखलात दगड मारायचा नाही, दीपाली सय्यद यांच्यावर टीका
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेवर टीके बाण सोडत आहेत. त्यांनी मनसेवर केलेल्या आरोपांबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, "काही लोकांबद्दल न बोललेलेच चांगलं. चिखलामध्ये दगड मारला तर आपल्या अंगावर चिखल उडतो हे आम्हाला लहानपणी शिकवलं आहे, त्यामुळे आम्ही कधी चिखलात दगड मारण्याचा प्रयत्न करत नाही."
शिवसेनेचं राज्य म्हणजे काय तालिबानी राज्य आहे का ? संदीप देशपांडे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्र प्रसिद्ध केलं होतं. हे पत्र घरोघरी वाटण्याचं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं होतं. मुंबईत काही ठिकाणी पत्रक वाटताना पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या या कारवाईवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांची सुरु असलेली दादागिरी आणि हुकूमशाही निषेधार्ह आहे. पत्रके वाटणे चुकीचं आहे का असा सवाल देशपांडे यांनी विचारला. शिवसेनेच्या लोकांनी काही केलं तरी चालतं. वरुण सरदेसाई यांनी पोलिसांना शिव्या घातल्या तरी चालतात, आम्ही पत्रक वाटली तर आम्हाला ताब्यात घेतं. हुकूमशाही आहे का? शिवसेनेचं राज्य म्हणजे काय तालिबानी राज्य आहे का, असं देशपांडे म्हणाले.