तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्यानं दुःख झालंय; अजित पवार यांचा विरोधकांना टोला
तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्यानं विरोधकांना दुःख झालं आहे : उपमुख्यमंत्री अजित पवारआमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, तुम्ही बघा, ती काळजी करा, असा टोलाही उपमुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
मुंबई : तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय. हे सांगत होते हे सरकार सहा महिन्यात जाईल गेलं नाही, वर्षात जाईल गेलं नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्ष चांगलेच भिडल्याचं पाहायला मिळालं. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.
विरोधकांना विचारलेले प्रश्न आणि आरोपावंर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण प्रश्न, ओबीसींचे प्रश्न असतील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही की कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने विरोधकांना दुःख झालं आहे. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते. आमच्या पाच येतील सत्ताधाऱ्यांची एक येईल, पण निकाल वेगळे लागले. नागपूरची जागा तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते खूप झोंबलं आहे. नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटतायत.
आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी परत येतील सांगता येत नाही : अजित पवार
पुण्याला चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते, पण आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आले. तिच गोष्ट औरंगाबाद, सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. धुळे-नंदुरबारची जागा अमरिश पटेल यांना तिथं घेतल्याने आली. अमरावतीला चुकलं, पण एक समाधान आहे तिथं भाजपचा आला नाही. शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिलं आहे. आता मला त्यांना सांगणं आहे, आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, तुम्ही बघा, ती काळजी करा, असा टोलाही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
ड्रेसकोडबाबत सरकार फेरविचार करतंय : अजित पवार
सरकारी कर्माचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत सरकार फेरविचार करतंय, जे योग्य आहे ते केलं जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले, की काल बातम्या सुरू होत्या 90 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च. मात्र, हे सरकार आल्यावर 17 कोटी 18 लाख खर्च झाला आहे. हा खर्च मंत्र्यांचे बंगले, सदनिका, विधानसभा, मंत्रालय, उच्च न्यायालय इमारती, सत्र न्यायालय इमारती, दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालये, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालयावर करण्यात आला आहे. त्या 90 कोटीत अंदाजे 20 कोटींची मागच्या सरकारची थकीत बिलं आहेत. आमच्या काळात 17 कोटी खर्च झाला आहे. वर्षा बंगल्याचं एक रुपयाही थकीत बिल नाही, तशीच स्थिती देवगिरी बंगल्याची आहे. त्यामुळे या बातम्यांत कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.