आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करणं ऐतिहासिक चूक असेल : मुख्यमंत्री
यांचे कधी दोन आकडी खासदार आले नाहीत आणि हे पंतप्रधान पदाची संगीत खुर्ची खेळत आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी नाही, तर भारतासाठी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतील भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. गेल्या पाच हजार वर्षात अनेक ऐतिहासिक क्षण आले. काही क्षण असे होते जे आले नसते तर भारत गुलामगिरीत गेला नसता. मात्र 2019 मध्ये जनतेला अशीच एक संधी आहे, जी देशाचं भाग्य आणि भवितव्य ठरवेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपचा पराभव करणं ऐतिहासिक चूक असेल : मुख्यमंत्री
2019 ला खिचडी सरकार आलं, तर देशाची काय अवस्था होईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीवर टीका केली. 2009 ते 2014 या काळात निर्णय न घेणारं काँग्रेस सरकार परत आलं, तर पुढच्या पाच वर्षांसाठी नाही तर पुढचे 50 वर्ष याचे परिणाम सोसावे लागतील. त्यामुळे 2019 ला भाजपला पराभूत केलं तर ती ऐतिहासिक चूक असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला
यांचे कधी दोन आकडी खासदार आले नाहीत आणि हे पंतप्रधान पदाची संगीत खुर्ची खेळत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
मुंबईतील 100 टक्के योजना आमच्या नाहीत, त्या 15 -18 वर्षांपूर्वीच्या आहेत. मात्र अकार्यक्षम आणि निष्क्रिय सरकारमुळे वाईट परिस्थिती मुंबईवर आली आहे. दिल्लीच्या मेट्रो आधी मुंबईची मेट्रो व्हायला पहिजे होती. मात्र विकासकामं वेळेत झाली नाहीत, यामागे इच्छाशक्तीचा अभाव हे प्रमुख कारण आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मागील सरकारला लगावला.