किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, अब्रुनुकसानीचा खटल्यामध्ये जामीन रद्द करण्यासंदर्भात याचिका
Kirit Somaiya : माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Kirit Somaiya : माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अर्थ एनजीओ आणि त्याचे संस्थापक प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवडी कोर्टात कोर्टाचा अवमानना केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. प्रवीण कलमे यांनी आपल्या याचिकेत म्हटलं की, गेल्यावेळच्या सुनावणीमध्ये किरीट सोमय्या यांना जामीनवर सोडून देण्यात आलं होतं. मात्र कोर्टाच्या बाहेर येताच किरीट सोमय्या यांनी प्रवीण कलमे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुन्हा टीका सुरू केली. तसेच आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांच्याविरोधात पोस्ट करू लागले. जी कोर्टाच्या आदेशाची अवमानना असल्याचे याचिकेत म्हटलं गेलं आहे.
कायदे तज्ञांच्या मते कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा जामीन रद्द करणं हे पुढचं पाऊल असू शकतं. याप्रकरणात आता पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोर्टाच्या पुढील सुनावणीमध्ये अब्रुनुकसानीचा दाव्यासोबतच कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आणि जामीन रद्द करण्यासंदर्भात सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अर्थ एनजीओ आणि त्याचे संस्थापक प्रवीण कलमे यांच्या मते, किरीट सोमय्या यांनी कोर्टात खोटं बोलत चुकीची माहिती दिली आहे. क्रिमिनल कंटेम्प्टची तक्रार दाखल करणं, ही आमची जबाबदारी आहे. ज्यामध्ये सहा महिन्यांची शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. किरीट सोमय्या ट्विटरच्या माध्यमातून टीका करत आहेत. मात्र मी कायद्यानेच माझा लढा सुरू ठेवणार असल्याचा प्रवीण कलमे यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी अर्थ एनजीओ आणि त्याच्या संस्थापक प्रवीण कलमे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध अनेक टीकास्त्र केले आहेत. ज्यानंतर अर्थ एनजीओ आणि त्याचे संस्थापक प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाने किरीट सोमय्या यांना समन्स बजावला होता, ज्यानंतर सोमय्या कोर्टात हजर झाले आणि कोर्टाने त्यांना जामीन दिला होता. मात्र दाखल करण्यात आलेल्या नवीन याचेकेसंदर्भात किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.