मतदानाच्या आदल्यादिवशीच 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा मृ्त्यू; ठाण्यात होमगार्डला ह्रदयविकाराचा झटका
मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघा अतिशय दु:खद घटना घडली आहे. येथील बुथ क्रमांक 189 मधील प्रिसायडींग ऑफिसरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई : राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात निवडणूक (Election) होत असून 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी, प्रशासनाकडून सर्वच स्तरावर कार्यवाही केली जात असून निवडणूक अधिकाऱ्यांचं काम आजपासूनच सुरू झालं आहे. त्यामुळे, बुथ प्रमुखांपासून ते प्रिसायडींग ऑफिसर व पोलीस यंत्रणाही संबंधित बुथवर जाऊन पाहणी करत आहे. उद्या 20 मे रोजी मतदान (Voting) केंद्रांवर मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र, याच दरम्यान, मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघा अतिशय दु:खद घटना घडली आहे. येथील बुथ क्रमांक 189 मधील प्रिसायडींग ऑफिसरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील 30 मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघात आज रोजी, 180 वडाळा विधानसभा मतदार संघ झोन 20 मधील बूथ क्रमांक 189 सेंट पॉल मुलांची शाळा येथे प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रियायडिंग ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या सुनील लक्ष्मण गवळी (वय वर्ष 56) यांना अचानक छातीत दुखून ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. दरम्यान, मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राहुल शेवाळ विरुद्ध अनिल देसाई यांच्यात थेट लढत होत आहे.
होमगार्डला ह्रदयविकाराचा झटका
दुसरीकडे अँटॉप हिल पोलीस ठाणे येथे निवडणूक बंदोबस्त करता असणारे होमगार्ड बक्कल नंबर 82 36/ विजय रूपसिंग राठोड (वय 29 वर्ष) राठी सैदापूर तालुका, जिल्हा सातारा यांना शनिवारी रात्री सौम्य हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर, राठोड यांना तत्काळ सायन रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून अतिदक्षता विभाग येथे अंतर रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले आहे. सदर होमगार्ड यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, सदर होमगार्ड यांच्या प्रकृतीवर सायन रुग्णालयातील स्टाफ व पोलीस प्रशासनही लक्ष ठेवून आहे.
22,100 पोलीस तैनात
लोकसभा निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यांतील मतदान 20 मे रोजी होणार असून बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. राजधानी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून पोलिसांची आगाऊ कुमूक मागविण्यात आली आहे.