Datta Dalvi : 'उद्धव ठाकरे कार्यकर्त्यावर प्रेम करणारे नेते', तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दत्ता दळवींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Datta Dalvi : पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केला आहे.
मुंबई : माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांनी 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतलीये. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने दत्ता दळवी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान या भेटीनंतर दत्ता दळवी यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी माझ्या अटकेच्या वेळी फोनवरुन माझ्याशी संवाद शाधला असल्याची माहिती यावेळी दत्ता दळवींनी दिली. तसेच उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहे. त्यांनी माझी आपुलकीने चौकशी केली, असं दत्ता दळवी यांनी यावेळी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील अवमानकारक जाहीर वक्तव्य प्रकरण दत्ता दळवींना भोवलं होतं. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दत्ता दळवी हे शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक. शिवसेनेतील फुटीनंतर दळवींनी ठाकरेंना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्र्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता दळवी चर्चेत आले होते. दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 153 (A), 153 (B), 153(A) (1) सी,294, 504,505 (1) (C) कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली. मात्र आज जामीन घेत असताना देखील सूडबुद्धीनं विलंब केला जातोय असा आक्षेप ठाकरे गटाकडून सातत्यानं घेतला जात होता.
पुन्हा ठाकरेच मुख्यमंत्री होतील - दत्ता दळवी
पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील यावेळी दत्ता दळवी यांनी व्यक्त केला. दरम्यान उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं देखील यावेळी म्हटलं.
कोणत्या अटी-शर्थींवर दत्ता दळवींना जामीन मंजूर?
प्रकरणाचा तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू
मुख्यमत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई
कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई
पोलिसांना सहकार्य करण बंधनकारक
कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक
कोण आहेत दत्ता दळवी? (Who Is Datta Dalvi)
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दत्ता दळवींची ओळख. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच 2005 ते 2007 या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे.