Datta Dalvi: गाडी फोडताना मी तिथे असतो तर दोघांना लोळवलं असतं; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दत्ता दळवी कडाडले
Datta Dalvi Get Bail : गद्दारांची औलाद नाही, आमच्यात शिवसेनेचं रक्त असल्याचं सांगत आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी घडवलं असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी म्हणाले.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांची जामीनावर सुटका झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना भाषणात शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. आज त्यांची जामिनावर मुक्तता झाल्यावर त्यांच्या कुटुंबाने त्यांची आरती ओवाळून स्वागत केले. आम्ही गद्दारांची औलाद नाही, शिवसेनेचे रक्त आहे आमच्यात, गाडी फोडताना तिथे असतो तर दोघांना लोळवलं असतं अशी प्रतिक्रिया या वेळी दत्ता दळवी यांनी दिली.
दत्ता दळवी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, या काळात शिवसैनिक माझ्याबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर उभे राहिले. ही बाळासाहेबांची किमया आहे. आम्ही गद्दारांची औलाद नाही. धर्मवीर आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये ही शिवी दिली गेली. तरीही मला जाणूनबुजून अटक केली. हा सत्तेचा माज आहे, सत्तेत असणाऱ्यांनी कसे वागवे ठरवावे लागेल.
गाडी फोडताना असतो तर,
माझे वाय 71 असले तरी आमच्यात शिवसेनेचे रक्त आहे. माझी गाडी फोडली तेव्हा मी असतो तर दोघांना तरी लोळवले असते. मी जेलमध्ये असताना ते कुणाला भेटले, कुठे बसले होते मला माहीत आहे. गांडुगिरी करून काय होणार? समोरच्यांची ही भ्याड वृत्ती आहे. आमच्या कुटुंबाला ही वेळ नवी नाही. शिवसेनाप्रमुखांनी घडवले, शिवसैनिक सदैव सोबत असतात. जेलमध्येही व्यवस्था केली.
अटक केल्यानंतर दोनदा पक्षप्रमुखांनी फोन केला होता, त्यावेळी आम्ही सगळे तुमच्या पाठिशी आहोत असं त्यांनी आश्वासन दिलं असल्याचं दत्ता दळवी म्हणाले. आता तुरुंगातून सुटल्यानंतर मातोश्रीवर जाणार असल्याचंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर गुन्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील अवमानकारक जाहीर वक्तव्य प्रकरण दत्ता दळवींना भोवलं होतं. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दत्ता दळवी हे शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक. शिवसेनेतील फुटीनंतर दळवींनी ठाकरेंना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्र्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता दळवी चर्चेत आले होते.
दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 153 (A), 153 (B), 153(A) (1) सी,294, 504,505 (1) (C) कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली. मात्र आज जामीन घेत असताना देखील सूडबुद्धीनं विलंब केला जातोय असा आक्षेप ठाकरे गटाकडून सातत्यानं घेतला जात होता. आज अखेर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: