Dasara Melava: ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत
Shivsena : बुधवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. राज्यभरातून लाखो कार्यकर्ते यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई: उद्याचा दिवस शिवसेनेसाठी खास आहे. कारण गेल्या अनेक वर्षांची परंपरा यंदा मोडीत निघाली असून यंदा मुंबईत दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आवाज घुमणार आहे. या दोन्ही दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
बीकेसीत येणाऱ्या शिंदे गट समर्थक कार्यकर्त्यांसाठी जेवणाची आणि मैदानातील आसन व्यवस्था सज्ज आहे. तर तिकडे शिवाजी पार्कातही तयारीला वेग आला आहे. पोलिसांनी दोन्ही मैदानाची पाहणी केली आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानात दाखल होणार आहेत. त्यामुळे कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी याचा आता जरी अंदाज बांधता येत नसला तरी उद्या चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रताप सरनाईक यांच्याकडे जबाबदारी
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून ठाण्यातील प्रसिद्ध आणि उच्चभ्रू प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाला दोन ते अडीच लाख फूड पकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. या फूड पॅकेट मध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ असून प्रत्येक कार्यकर्त्याला दिले जाणार आहेत.
बीडहून शिवतीर्थावर चालत
ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी बीडहून चालत मुंबई गाठली आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेला हा पायी प्रवास अखेर नवी मुंबईत विसावला आहे. महिला शिवसैनिकही मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाल्या आहेत.
नाशिकमधून (Nashik) शिंदे गटाचे 28 हजार तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने 25 हजार शिवसैनिक मुंबईत येणार असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून जवळपास 50 हजारांचा ताफा मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती आहे.
औरंगाबादहून एक हजार गाड्यांचा ताफा जाणार, सत्तारांचा दावा
साडेतीनशे एसटीबससह इतर छोट्या-मोठ्या अशा एकूण एक हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मराठवाड्यातील अंदाजे एक लाख लोकं जातील असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
दसरा मेळाव्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आली आहे. तो बदल खालीलप्रमाणे,
- पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.
- संत ज्ञानेश्वर मार्गावरुन कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.
- खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.
- सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथुन प्रवेशबंदी राहील.
- पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरुन, बीकेसीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना कनेक्टर ब्रिज चढण दक्षिण वाहिनी येथुन जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.























